
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, परिसरातून विविध उपक्रमांची अंमलबजावणी, प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येतो. यावर्षीही जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
यामध्ये राळेगाव पंचायत समिती धानोरा केंद्राअंतर्गत येत असलेल्या दोपोरी ( कासार) येथील सौ. नीलिमा काशीराव पाटील सहाय्यक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 जाहीर झाला आहे.
एक शिक्षकी, अत्यंत अडचणीच्या व आडवळणाच्या, रस्ता नसलेल्या दुर्गम भागातील शाळेत कार्य करत असताना पाटील मॅडम यांनी दापोरीसारख्या वाळवंटात नंदनवन फुलविले आहे. एक शिक्षकी शाळा कशी आदर्श असावी याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दापोरी शाळा होय. शाळेचा संपूर्ण कायापालट करून अध्यापनात नाविन्यपूर्णता आणत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, पालक व गावकऱ्यांचा सहभाग वाढविणे या माध्यमातून शाळेला आदर्श स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वतीने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या यशाबद्दल त्यांचे गावातून, केंद्रातून, तालुक्यातून, सामाजिक संस्था तसेच सर्व समाजबांधवांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.
