
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
येथील पंचायत समितीच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा आणि पाणी टंचाई आढावा बैठकीत प्रशासकीय कारभाराचे वाभाडे निघाले. तालुक्यातील रखडलेली विकासकामे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे संतापलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामध्ये आपटी येथील महिला प्रतिनिधी कविता धुर्वे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला.
मा. प्रा. डॉ अशोकराव उईके अध्यक्षस्थानी होते, प्रमुख अतिथी म्हणुन मा. सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा. प्रफुलसिंह चव्हाण, मा. चित्तरंजनदादा कोल्हे, मा. प्रविणभाऊ कोकाटे, संजय काकाडे, तहसीलदार , केशव पवार गटविकास अधिकारी, भारती ईसळ, सागर विठाळकर, शंकरराव हटकर वन विभाग, अभिषेक बोरगमवार, मा. निचतसाहेब, गवई उप अधीक्षक भूमि अभिलेख, परेकर मुख्याधिकारी नगर पंचायत, चव्हाण पाणी पुरवठा, मा. योगेश दंदे पोलीस विभाग
● कविता धुर्वे यांनी मांडला समस्यांचा पाढा
सभेत बोलताना कविता धुर्वे यांनी आपटी गावातील विदारक स्थिती सभागृहासमोर ठेवली. “आमच्या गावात पाईपलाईनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे, रस्ते उखडलेले आहेत आणि दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही सौर ऊर्जा संच (सोलर) बसवण्यात आलेले नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेषतः स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा मुद्दा त्यांनी लावून धरला. पावसाळ्यामुळे स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले असून तिथे अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
● “ग्रामसभा केवळ कागदावरच का?” – धुर्वे यांचा सवाल
प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवताना कविता धुर्वे यांनी विचारले की, गावागावात होणाऱ्या ग्रामसभा केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत का? “सभेला सरपंच किंवा महत्त्वाचे लोक उपस्थित नसतानाही ग्रामसेवक इतिवृत्त (प्रोसिडिंग) कसे काय लिहितात?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली.
● पाणी टंचाई आणि रखडलेल्या घरकुल योजना
आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत घरकुल योजना व पाणी टंचाईचा प्रश्नही गंभीरपणे चर्चिला गेला. अनेक गावांमधील पाणी योजना तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. घरकुल योजने विषयी वंचित लाभार्थ्यांना तात्काळ यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
या बैठकीला माननीय. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविता धुर्वे यांनी मांडलेल्या या समस्यांची दखल घेऊन प्रशासन आता ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
