
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर| भारतीय स्टेट बैंकेच्या नाकर्तेपणामुळं 4 महिन्यापासून कृषी कर्जाच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. त्यामुळं बैन्केसमोर शेतकरी महिला पुरुषांच्या रांगा लागत असून, कनेक्टिव्हिटी नसल्याने आणि ऑडिट चालू असल्याच्या नावाखाली कर्ज प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगून अधिकारी हातवर करत आहेत. रब्बी हंगाम सुरु होऊन महिना उलटला मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाच्या फायली मंजुरी अभावी प्रलंबित आहेत. याकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन साहेबांनी लक्ष देऊन तात्काळ कर्ज प्रकरणे निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांनी केली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी गेल्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कृषी कर्जाच्या फायली दाखल केल्या आहेत. त्या फायलींना प्रलंबित ठेऊन अधिकारी आज या – उद्या या असे म्हणत दिवस पुढे ढकलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभराची कामे सोडून बैन्केसमोर ताटकळत बसावे लागत आहेत. हा प्रकार काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल मादसवार यांच्या लक्षात आणून दिला. यावेळी त्यांनी शाखाधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सकाळचे ११.३० वाजूनही कामकाजाला सुरु झाली नसल्याचे उपस्थित ग्राहक व शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रलंबित फायली मार्गी लावून कर्जपुरवठा करण्यात यावा. दलालांची कामे बंद करून गरजू शेतकऱ्यांना न्याय द्यावा. रक्कम भरण्यासाठी आलेल्या खातेधारकांना सीएसपी केंद्रात न पाठविता बैंकेमार्फत सर्व प्रकारची रक्कम स्वीकारून लागणाऱ्या भुर्दंड पासून सुटका द्यावी. विद्यार्थी व नवीन खातेधारकांची खाते तत्काळ काढून देण्यात यावीत, शाखेमध्ये दोन कैश काउंटर व एक जेष्ठ नागरिकांसाठी काउंटर सुरु करण्यात यावेत. लोकसंख्येनुसार शहरात राष्ट्रीयकृत बैन्केची शाखा मंजूर करून सुरु करावी, एसबीआय बैंकेत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरून ग्राहकांची होणारी कुचंबणा थांबवावी यासह अनेक मागण्या करण्यात आली.
तसेच अनिल मादसवार यांनी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क साधला. आमदार जवळगावकरांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सक्त सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले कि मला येऊन चार दिवस झाले, ऑडिटचे काम संपताच दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जाचे प्रस्ताव मंजूर करून न्याय देऊ असे आश्वासन दिले. यानंतर तरी शेतकऱ्यांची प्रलंबित कर्ज प्रकरणे मार्गी लागतील का..? अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहेत. एवढ्यावरही शेतकऱ्यांना कर्जासाठी टाळाटाळ झाली तर शेतकरी, खातेदार हक्काच्या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याच्या तयारीत आहेत. यावेळी कर्जाच्या फायली दाखल करून चार महिने लोटलेले खातेदार मधुकर देशपांडे, बालाजी गिरमाजी कदम, मारोतराव जांभुळकर, शकुंतलाबाई बाबुराव कदम पळसपूर, भगवान गणपतराव सिरंजनी, सरस्वताबाई दिलीप सावळे, सुनील चव्हाण बऱ्हाळी तांडा, इरफान खान गाजी खान हिमायतनगर, शिवसैनिक प्रकाश रामदिनवार, अनिल भोरे, काँग्रेस कार्यकर्ता सचिन माने, व्यंकटेश गूडेटवार, आदींसह अनेक महिला -पुरुष शेतकरी व खातेदार ग्राहक उपस्थित होते.
शेतकरी, खातेदार यांच्या कृषी कर्जाच्या फायली निकाली नाही निघाल्या तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा अनिल मादसवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रति नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खा.हेमंतभाऊ पाटील, आ.माधवराव पाटील जवळगावकर, एसबीआयचे नांदेड जिल्हा प्रबंधक, जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तहसीलदार हिमायतनगर यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. यावेळी नांदेड २४ न्यूजचे संपादक गोविंद गोडसेलवार, वज्रसूची न्यूजचे संपादक शुद्धोधन हनवते, लोकपत्रचे तालुका प्रतिनिधी दिलीप शिंदे, पत्रकार गणेश राऊत, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, विष्णू जाधव, सुनील चव्हाण, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
