
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर| शहर व ग्रामीण भागात अवैद्य देशी दारू विक्रीला ऊत आला आहे, असे असताना याकडे संबंधित पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने गोर-गरीब नागरिक व मजुरदार युवा पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. नुकतेच हिमायतनगर शहरात पोलिसांनी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आलेल्या एकाला पकडून कार्यवाही केल्याने हा प्रकार समोर आला आहे.
शहर व परिसरात अवैद्य दारूची विक्री व बनावट हातभट्टी दारूचा गोरखधंदा जोमात सुरु आहे. सध्या सण उत्सवाची रेलचेल सुरु झाली असून, याचा फायदा घेत शहरासह ग्रामीण भागात काही महाभागांनी दारूची वाहतूक करून चोरट्या मार्गाने विक्री करणे, हातभट्टी गाळून मजुरदार, शेतकरी व युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे वळविण्याचे काम सुरु केले आहे. त्यातच ग्रापंचायतीच्या निवडणूका चालू झाल्या असल्याने जिकडे – तिकडे दारू- मटणाच्या पार्ट्या जोरात सुरु आहेत. गरजू उमेदवार आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी दारूची जमवाजमव करत आहेत. त्यामुळे अवैद्य दारू विक्रीला व साठेबाजी करण्याला ऊत आला असून, ग्रामपंचायत निवडणूक परिसरात दारूचा महापूर वाहत असल्याचे सुजाण नागरिक सांगत आहेत.
याचं संधीचा फायदा घेण्यासाठी दि.०७ जानेवारी रोजीचे सायंकाळी ४.१५ मिनिटांनी नगरपंचायत जवळील पाण्याच्या टाकी शेजारी आरोपीने विना परवाना बेकायदेशिर रित्या, देशी दारु किंमती २ हजार ४९६ रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. यावेळी त्यास अटक करून पोहेकॉ. बालाजी लक्षटवार यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे हिमायतनगर येथे दिल्यावरून कलम ६५ (ई), महाराष्ट्र प्रोव्हिशनल कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. बालाजी लक्षटवार हे करीत आहेत. याचं प्रमाणे शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या अवैद्य देशी -विदेशी दारू विक्रीकडे पोलिसांनी लक्ष देऊन निवडणूक काळात हे प्रकार वाढणार नाहीत याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी व्यसनाधीनतेचा विरोध करणाऱ्या महिला – पुरुष नागरीकातून केली जात आहे.
