


सहसंपादक:प्रशांत बदकी
चमोलीः उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. उत्तराखंडच्या जोशीमठात हिमस्खलनं झाल्यानं धरण फुटले. या धरण फुटीमुळे पाण्याच्या प्रवाहाला गती मिळाली असून, या पर्वताच्या खालच्या भागात बरेच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बरेच लोक या पाण्यात वाहून गेल्याच्या बातम्याही आल्यात. यंदाची ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.हा अपघात हिमकडा कोसळल्यानं झाला आहे आणि खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर बर्याच भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीकाठच्या लोकांना उंच भागात जाण्यास सांगितले जात आहे.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या जोशीमठात हिमस्खलन झाल्यानं धरण फुटले. यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला आणि पाणी वेगाने खाली येऊ लागले. या पाण्यात अनेक लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. हा अपघात तपोवनच्या वरच्या ‘धौली गंगा’ नदीवर झालाय. हिमनगाचा एक मोठा भाग पर्वतावरून खाली आला, ज्यामुळे धरण फुटले आणि नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला.
अपघात कोठे झाला?
उत्तराखंडच्या जोशीमठ येथे हरिद्वारपासून सुमारे 238 किमी अंतरावर हा अपघात झाला. तसेच ही घटना धौली गंगा येथे घडली.
