हिमायतनगरात पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी सिमेंट रस्ता फोडला;नागरिकांच्या अडचणीत भर पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट, वरद विनायक मंदिराकडील टाकीला मुहूर्त मिळेना

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे काम संत गतीने सुरु आहे, परिणामी शहरातील नागरिकांनी टंचाईच्या झाला सोसाव्या लागत आहेत. असे असताना ठेकदाराकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन पद्धतीने मुरली बंधाऱ्यावर विहिरीचे बांधकाम व शहरातील (जलकुंभ) टाकीचे काम पूर्ण करूनच पाईपलाईन करावयाची असताना शहरातील सिमेंट रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी कोट्यवधी खर्च करून बनविण्यात आलेले रस्ते खराब करून आत्तापासूनच नागरिकांना अडचणींचा सामना करण्यास ठेकेदाराने भाग पाडले आहे. हा प्रकार म्हणजे पुन्हा नव्याने रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेऊन आपले उखळ पांढरे करून घेण्याचा नव्हे काय..? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
हि बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व नागरिकांची तहान भागविण्यासाठी वरद विनायक मंदिर परिसरात सुद्धा एका जलकुंभ उभारावे अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा या भागातील जनतेचा उद्रेक आगामी नगरपंचायत निवडणुकितच्या मतदानातून दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना मात्र ठेकेदाराकडून शहरातील जलकुंभ (टाक्याचे) बांधकाम करण्यापूर्वीच चक्क अंदाजपत्रकाला बगल देऊन ठेकेदाराने केवळ निधी लाटण्याच्या उद्देशाने शहरातील पाईपालाईनचे काम हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे. सदर पाईपलाईनच्या कामातही अनियमितता दिसून येत असून, अनेक ठिकाणी पाईपलाईन म्हणावी तशी खोदून टाकण्यात आलेली नाही. यासाठी वापरण्यात आलेली पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असून, पाईपलाईन पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेल्याचे पाहावयास मिळते आहे. यावरून अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या आयएसआय कंपनीचे पाईप असले तरी फास्ट क्वालिटी सोडून थर्ड क्वालिटीचे वापरण्यात येत असल्याचे दिसते आहेत.
एवढेच नाहीतर शहरातील अनेक गल्लीबोळांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम एकही पाण्याची टाकी पूर्ण झालेली नसतांना सुरु करून चक्क नव्यानेच बनविण्यात आलेले सिमेंट कोंकेटचे रस्ते फोडून ठेकेदाराने वस्तीतील नागरिकांना आत्तापासून अडचण निर्माण केली आहे. अगोदरच शहरात झालेल्या निकृष्ट सिमेंट रस्त्याचे अल्पावधीत धुळीत रूपान्तर झाले असताना आणखी हे रस्ते फोडून पुन्हा नव्यानं या रस्त्यासाठी निधी मंजूर करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा खटाटोप केला जात आहे. हा सर्व प्रकार बड्या राजकीय पुढार्यांना हाताशी धरून अभियंता, ठेकेदार व मुख्याधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.
हि बाब लक्षात घेता जिल्हाधीकारी महोदयांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान प्रकल्पाच्या या पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष देऊन हिमायतनगर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण न करता अर्धवट ठेऊन नियमबाह्य पद्धतीने निकृष्ट दर्जाचे पाईप वापरून केल्या जाणाऱ्या पाईपलाईनचे काम थांबवून याची चौकशी करून रस्ते फोडल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही करावी. आणि अगोदर नियमाप्रमाणे मुरली बंधाऱ्यावरील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, नंतर शहरातील चारही बाजूने पाणी साठ्याच्या टाक्या उभारून नंतर पाईपलाईन करावी. तोपर्यंत शहरातील नागरिकांना यामुळं अडचण निर्माण होणार नाही यासाठी ठेकदाराकडून शहरवासीयांची तहान टैन्करद्वारे पाणीपुरवठा करून भागवावी आणि पश्चिम, पूर्व भागातील नागरिकांसाठी वरद विनायक मंदिर परिसरात नवीन जलकुंभ उभारावे अशी रास्त मागणी पाणी टंचाईने भटकंती करणाऱ्या महिला, पुरुष नागरीकातून केली जात आहे