
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल
ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यात मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. ग्रामीण रुग्णांना पुरेसा उपचार मिळत नसल्याने त्यांची व नातेवाईकांची फरफट होत आहे. त्यात ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांचा जीव वाचवण्यात मोठी भूमिका बजावत आहे.
मात्र आरोग्य केंद्रामध्ये योग्य यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना शहराकडे जावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन कचारी सावंगा येथील रहिवासी सचिन मेहर यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट दिली.
सचिन मेहर हे नागपूर येथे बांधकाम व्यावसायिक असून नेहमीच समाजकार्यात असतात. वैद्यकिय अधिकारी डॉ. मानेकर यांच्याकडे ही मशीन सुपूर्द केली आहे.
यावेळी सरपंच रवी जैस्वाल यांच्यासह गावकरी उपस्थित होते. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनची कचारीसावंगा आणि परिसरातील कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात मदत होणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात गावाविषयी आत्मीयता असल्याने आणि इतरही नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी आणि रुग्णांचे प्राण वाचावे, या उद्देशाने हा पुढाकार घेतल्याची भावना सचिन मेहर यांनी यावेळी व्यक्त केली.
