
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा ग्रेट भेट उपक्रम
तालुका प्रतिनिधी/२५ सप्टेंबर
काटोल – स्वतःला विकसित करून समाज उत्थानासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.आपण ठरविलेले ध्येय पूर्ततेसाठी स्वतःचे नोटस तयार करणे आवश्यक आहे.अभ्यासाचे आउटपुट म्हणजेच यश होय.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना वर्ग ५ ते १२ पर्यतचा शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा.कारण हीच पाठ्यपुस्तके स्पर्धा परिक्षेचा पाया आहे असे प्रतिपादन स्पर्धा प्रबोधिनी स्कुल ऑफ कॉम्पीटिशन, नागपूरचे संचालक विरेंद्र दिनकरराव पिलोंद्रे यांनी ‘ग्रेट भेट’ उपक्रमातंर्गत जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.
कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, नबीरा महाविद्यालयाचे प्रा.परेश देशमुख, केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे पिलोंद्रे म्हणाले,स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी मनाचा वेध घेऊन नियोजन करावे.प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर वाटचाल करणे आवश्यक आहे.यासाठी प्रश्नपत्रिका चाळणे त्याचे विश्लेषण करणे व गटचर्चा करणे हे टप्पे महत्त्वाचे आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना मिळालेले ज्ञान हे आयुष्याची शिदोरी असते.जर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त झाले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात या शिदोरीचा फायदा उपजीविकेसाठी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड, संचालन केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया तर आभार प्रदर्शन संगणक ऑपरेटर सतिश बागडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिचारिका अनुसया रेवतकर व सुरक्षा रक्षक मंगेश लाडसे आदींनी सहकार्य केले.
