नागपुरात निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला; अख्खे कुटुंब थोडक्यात वाचले

नागपूर: कळमना मार्केटकडे जाणाºया मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेली होती. या गाडीत अख्खे कुटुंब होते. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत होती. हा पूल एमबी टाऊन ते कळमना मार्केटला जोडला आहे. काही आठवड्यापूर्वी येथे गर्डर टाकण्यात आले होते. अचानक मंगळवारी रात्री गर्डर खांबावरून घसरला आणि जमिनीवर कोसळला. 
पूल कोसळताच मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे एकच गर्दी केली. काही काळासाठी येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा पूल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधला जात आहे.