तरुणीच्या खुनाने नंदुरबारात खळबळ, खुनाचे धागेदोरे न सापडल्याने आरोपीच्या शोधात अडचण

प्रतिनिधी- चेतन एस. चौधरी

नंदुरबार – शहरालगत असलेल्या बिलाडी-नारायणपूर रस्त्याजवळ रेल्वे रूळापासून पाच मीटर अंतरावर एका शेताजवळ अंदाजे २२ ते २५ वर्षीय एका युवतीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या युवतीचे धडापासून वेगळे केलेले शीर १५ फुट अंतरावर आढळून आले. तसेच तिचा हातही कापलेला आढळला आहे. शेतमालकाने याची खबर पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आढळल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस दलाने घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानाने धानोरा रस्त्यावरील पुलापर्यंत माग काढला. अधिक तपासासाठी फोरेन्सिक लॅबमध्ये विविध नमुने पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, डीवायएसपी सचिन हिरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील भेट देवून पाहणी केली. अज्ञात कारणाने धारदार शस्त्राने सदर युवतीचा निर्घुण खुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले करित आहेत.
दरम्यान नंदुरबार शहर व परिसरात पोलिसांनी अधिक तपास केला असता कुठलीही युवती हरविल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे हि युवती कोण, तिचा खुन कुठल्या कारणाने झाला हे शोधणे पोलिसांना मोठे आव्हान आहे
.