
एकच पुस्तक वारंवार वाचा
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा उपक्रम
पशुधन विकास अधिकारी डॉ. पुनम नागपुरे यांचा सत्कार
तालुका प्रतिनिधी/११ ऑक्टोबर
काटोल – स्पर्धा परीक्षेचे वातावरण पुणे शहरात असते तसेच वातावरण जि.प.स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्रात आहे.विद्यार्थ्यांनो, तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्याचा अभ्यासक्रम जाणून घ्या.जुन्या प्रश्नपत्रिका चाळा. व स्वतःच्या नोट्स तयार करा.दुसऱ्यांदा प्रभावित करण्याकरिता इंग्रजी पुस्तकांच्या मागे न लागता.तुम्हाला जी भाषा सहज वाटते त्या भाषेत अभ्यास करा.अनेक पुस्तकांचे वाचन केल्यापेक्षा एकच पुस्तक वारंवार वाचा. इंटरनेटच्या मोहजालात न अडखळता इंटरनेटचा मर्यादेत वापर करून अभ्यास करा असे प्रतिपादन नायब तहसिलदार भागवत पाटील यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र ,काटोल येथे ‘ग्रेट भेट’ उपक्रमातंर्गत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार विजय डांगोरे , मार्गदर्शनक म्हणून नायब तहसीलदार भागवत पाटील, सत्कारमुर्ती पशुधन विकास अधिकारी डॉ.पुनम दिवाकर नागपुरे, तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नुकतीच महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘पशुधन विकास अधिकारी’ पद प्राप्त केलेली डॉ.पुनम दिवाकर नागपुरे हीचा शाल,सन्माचिन्ह, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देतांना डॉ.पुनम म्हणाली,आर्थिक परिस्थितीवर मात करीत संघर्षातुन अभ्यास केला.तेव्हाच माझ्या अश्रूंची फुले झाली.विद्यार्थ्यांनो, समस्यांचा राईचा पर्वत न करता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून अभ्यास करा यश पदरात नक्की पडेल.
प्रशासकीय सेवेत कार्य करतांना अनेकदा काटे व फुले येतात.काटे दूर करून सामाजिक ऋण फेकले तरच ‘यशस्वी अधिकारी’ होऊ शकतो असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून नायब तहसिलदार विजय डांगोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के , संचालन शरयू मलमकर तर आभार प्रदर्शन नोमादेवी खुरपडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक ऑपरेटर सतिश बागडे, गुंजन रिठे, अजित निंबूळकर, भूषण ठोबरे, धनश्री खसारे,वैष्णवी ठाकरे, निखिल देशभ्रतार आदींनी सहकार्य केले.
