
विद्यार्थ्यांनी दिवाळीत दाखविले हस्तकौशल्य
तालुका प्रतिनिधी/१ नोव्हेंबर
काटोल – शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान आत्मसात करण्यासाठी जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) अंतर्गत उन्नती विद्यार्थी बचत बँक कडून पणती व आकाशकंदील निर्मिती व विक्री उपक्रम थुंगाव (निपाणी) व तिनखेडा गावात राबविण्यात आला.
उपक्रमाचे उदघाटन नरखेड पंचायत समिती सदस्य महेंद्र गजबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी थुंगाव (निपाणी) सरपंच बापूराव बडोदेकर, उपसरपंच प्रविण चोपडे, तिनखेडा सरपंच सुरेश बारई, जनकराव चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर चोपडे, पंढरी आखरे, किसना बन्नागरे प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी कलात्मक दृष्टीतून स्वहस्ते तयार केलेले आकाशकंदील व रंगकाम केलेल्या पणत्या अतिशय सौदर्यपूर्वक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे उपक्रम शाळास्तरावर राबविणे आवश्यक आहे.तसेच केवळ नोकरीच्या मागे न धावता कौशल्य विकासाला प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारी प्रश्नावर तोडगा काढता येऊ शकतो असे मत सरपंच बापूराव बडोदेकर यांनी व्यक्त केले.
उपक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे, शिक्षक संदीप बागडे, शिक्षक निलेश शहाकार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मित्र दीपाली हिवसे व संध्या नागपूरे तसेच विद्यार्थी सलोनी बडोदेकर, धिरज देशमुख, शुभम ओमकार, वैभव घागरे, युवराज रमधम आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
आत्मनिर्भर भारताची संकल्पना खऱ्या अर्थाने राबविण्याचे कार्य शाळेत होत आहे.विद्यार्थी विविध क्षेत्रात आपला ठसा उमठवित आहे.स्पर्धा परीक्षेची क्षेत्र असो की कलात्मक क्षेत्र यात थुंगाव (निपाणी) शाळेने वर्चस्व निर्माण केले आहे.भविष्यात पंचायत समिती नरखेडच्या वतीने असेच उपक्रम राबविण्यात येईल.
- महेंद्र गजबे
सदस्य, पं. स.नरखेड
