
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
अतिवृष्टी ने जिल्ह्यात तब्बल तीन लाख 43 हजार 803 हेकटर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठविला. यात जिल्हयातील 1533 तर राळेगाव तालुक्यातील 133 गावांचा समावेश आहे. यातील आपदाग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदतीची अपेक्षा होती मात्र त्यावर पाणी फेरल्या गेलें. उलट दिवाळी आधी जिल्ह्याची सुधारित आणेवारी 53 पैशाच्या आत काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कामं केले आहे. जिल्हाधिकारी यांनी जाहिर केलेल्या राळेगाव तालुक्याची सुधारित आणेवारी 54 टक्के निघाली आहे.
राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी शेतकऱ्यांना दिवाळी आधी अतिवृष्टीची मदत देण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. जर जिल्ह्यातील 1555 गावे अतिवृष्टीने बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभाग तयार करतो. तर त्याच्याच काही दिवसांनी जिल्हाधिकारी जिल्ह्याची आणेवारी 53 टक्के कशी काय जाहिर करतात हा ही मोठा प्रश्नच आहे. एकीकडे अतिवृष्टी होऊन शेतमालाचे नुकसान झाले हे कृषी विभागाच्या अहवालाने मान्य करायचे त्याची मदतही शेतकऱ्यांना द्यायची नाही. वरून दिवाळीच्या तोंडावर सुधारित आणेवारी 50 टक्के च्या वर काढून मदतीचे मार्ग अवरुद्ध करायचे हा तुघलकी प्रकार सुरु आहे.
यंदा संततधार पावसाने सोयाबीन सडली तर कपाशीची बोन्डे सडली. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. सुधारित आणेवारी याचे प्रतिबिंब उमटेल अशी अपेक्षा होती. मात्र जाहिर झालेल्या आणिवारीने जिल्ह्यात पीकस्थिती उत्तम असल्याचे कागदि घोडे नाचवून शेतकर्यांची थटा केली.
कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी महागाई भत्या ची गोड बातमी देणाऱ्या शासनाला जगाच्या पोशिंद्याचे तोंड कडू करण्याची अवदसा का आठवावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वाढल्याचा आकस नाही मात्र त्या तुलनेत शेतकर्यांना नेहमीच का डावलण्यात येते हा सवाल आहे. काही अडाणटपू यंदा कापसाला चांगला दर मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी त्यातच समाधान मानावे अशीही मुक्ताफळे उधळत आहे. या टोणग्याना यंदा एक दोन वेच्यातच कपाशीची उलनंवाडी होऊन नापिकी होणार हे दिसतं नसावे याचेच आछर्य वाटते. एकदंरीत अतिवृष्टी चा कृषी विभागाचा शासकीय मदतीकरीता सकारात्मक अहवाल, व जिल्हाधिकारी यांचा सुधारित आणेवारी चा शेतकर्यांसाठी नकारातमक अहवाल ‘राजा उदार झाला व हाती भोपळा दिला’ या सदरात मोडणारा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
