देवधरी घाटात आंतरराज्यीय जनावर तस्करीचा पर्दाफाश,वडकी पोलिसांची राष्ट्रीय महामार्गावर कारवाई रात्रगस्तीदरम्यान झडतीत प्रकार उघड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नागपूर-हैद्राबाद या ४४ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर रात्रगस्तीदरम्यान वाहन तपासणीत आंतरराज्यीय गोवंश तस्करीचा वडकी पोलिसांनी पर्दाफाश केला. तेलंगणात कत्तलीसाठी जात असलेल्या जनावरांचा ट्रक पोलिसांनी पकडला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास देवधरी घाटात करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ या नागपूर- हैद्राबाद मार्गावरील देवधरी घाटात वडकी पोलिसांची रात्रगस्त
सुरू होती. दरम्यान अशोक लेलँड कंपनीचा टीएल ४९ एएल ४०६६ या क्रमांकाचा ट्रक सदर मार्गाने जात होता. वडकी पोलिसांच्या पथकाने बॅटरीचा प्रकाश टाकून सदर ट्रक थांबविला. या ट्रकची पोलिसांनी झाडाझडती घेतली. तेव्हा या ट्रकमधून २५ हजार रुपये किंमतीचा एक असे २० बैल ताब्यात घेण्यात आले. या पशुधनासह वाहतुकीतील ट्रक असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल वडकी पोलिसांनी या कारवाईतून जप्त केला. या ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीतेने जनावरांच्या पायांना दोरी बांधून त्यांना कोंबून नेले जात होते. त्या ठिकाणी या जनावरांच्या चारापाण्याची साधी व्यवस्था देखील नव्हती. हा सर्व प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी ट्रकचालक आरोपी अब्दुल हाफिज गुफान खान (३०) रा. वॉर्ड क्र. ४ भवानीनगर गडचांदूर जि. चंद्रपूर याला अटक केली. कसून चौकशीत
त्याने तेलंगणात ही जनावरे नेली जात असल्याची कबूली दिली. ही कारवाई ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार मंगेश भोंगाडे, जमादार विकास धडसे, किरण दासरवार, गजानन अडपवार यांनी केली
.