
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोना आणि निमोनियाची लागण झाली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत होती. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावली. आज त्यांचं निधन झालं आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे.
काय म्हटलं आहे शरद पवारांनी?
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
