अवजड वाहतूकीविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225)

राळेगांव तालुक्यातील खैरी या गावातुन सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या अवजड वाहतूकीविरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडकी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मागिल महिन्यामरापासून चंद्रपूर जिल्ह्यातून कोसारा खैरी मार्गे वणी तसेच घुग्गूस आदी ठिकाणी कोळशाची अवजड वाहतूक दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच लगतच्या कोसारा वाळू घाटातून देखील काही दिवसांपासून वाळूची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोसारा ते खैरी तसेच खैरी ते वडकी व खैरी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गावातुन जाणाऱ्या ८०० मीटर अंतराच्या सिमेंट रोडची अक्षरश: चाळण होतं असल्याने हि जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यापुर्वी तालुका प्रशासनाकडे खैरी वासियांनी दिली होती. मात्र तालुका प्रशासनाने खैरी ग्रामस्थांच्या मागणीला केळाची टोपली दाखविल्याने अखेर निवेदनकर्त्यांनी रास्तारोको आंदोलनाचा पवित्रा उगारत आज १० फेब्रुवारी रोजी खैरी येथील इमली पॉईंटजवळ दिपक महाजन यांच्या नेतृत्वात वरोरा ते वडकी हा राज्य मार्ग काही काळ अडवून धरला होता. दरम्यान अवजड वाहतूकीवर आळा घालावा. तसेच या मार्गावर आठवडी बाजारासह शाळा व कॉलेज असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्फत प्रशासनाला देण्यात आले. परीणामी या मार्गावरील जड वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनात शिवसेनेचे मनोज भोयर, खैरी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रमोद बोडे, सदस्या सौ. लता पवार, सौ. सोनाली दिपक महाजन, डॉ. संजय पवार, राजू धांदे, नरेश कचवे यांच्या सह अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.