घरातील पाळीव श्वान हा परिवारातील एका सदस्याप्रमाणे:विजय चोरडिया यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

,आम्ही जे कपडे परिधान करतो तेच कपडे श्वानासाठी

वणी :नितेश ताजणे

श्री रामनवमी निमित्त शहर भगवामय करण्यात, रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष विजय चोरडीया यांनी मोठे परिश्रम घेतले होते. दरम्यान त्यांनी स्वता व परिवारातील सदस्यांसह घरातील पाळीव श्वानाला भगवे कपडे परिधान करून, शोभा यात्रा मिरवणूकीत सामील झाले होते. शोभायात्रा मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली, मात्र मिरवणूकीत श्वानाला भगवे कपडे परिधान केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. परिणामी आज दि.१६ एप्रिल रोजी शनिवारला ,विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास खुलासा देऊन दिलगीरी व्यक्त केली.
सविस्तर वृत्त असे की, श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दि.१० एप्रिलला भव्य दिव्य असे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शहरातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत श्री राम नवमी उत्सव समिती अध्यक्ष विजय चोरडिया यांनी स्वता व परिवारातील सदस्यांसह आपल्या पाळीव श्वानाला भगवे वस्त्र परिधान करून वातावरण भगवामय करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही विरोधकांनी श्वानाचे छायाचित्र काढुन,सोशल मिडिया वर वायरल करून विनाकारण बदणामी करण्याचा कट रचल्याचे, आज दि.१६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय चोरडीया यांनी सांगितले.
रामनवमी समिती अध्यक्ष म्हणून निवड होताच विजय चोरडिया यांनी , रक्तदान शिबिर, अन्नछत्र, शहरात पाणपोई , गरजुंना मदत करीत समाजकार्य करुन, सामाजिक ऐक्य जोपासण्याचा प्रयत्न केला. परंतु काही समाज कंठकामुळे अशी परिस्थिती उद्भवली असून त्यांच्या कटकारस्थानाला न जुमानता आपले सामाजिक कार्य सदैव असेच सुरु राहील, असेही रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.
यावेळी राजाभाऊ बिलोरिया,शाम भडघरे, अजिंक्य शेंडे, उमेश पोद्दार सह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

तो “श्वान” परिवारातील सदस्या प्रमाणे

माझ्या घरी असलेला पाळीव श्वान हा माझ्या परिवारातील एका सदस्यांप्रमाणे असुन श्वानाला आम्ही खंडोबा मानतो आणि खंडोबा हे हिंदूंचे दैवत आहे. दैवताचे पूजन करणे हि हिंदू संस्कृती आहे. प्रत्येक सणाला आम्ही जे कपडे परिधान करतो, तेच कपडे त्या श्वानासाठी तयार करतो. ते श्वान माझ्या परिवारातील सदस्याप्रमाणे असल्यामुळे, आम्ही श्रीराम नवमी शोभा यात्रेत भगवा रंगाचे वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो.
विजय चोरडिया – अध्यक्ष श्री रामनवमी उत्सव समिती वणी