
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव सालेभट्टी, मंगरूळ गावच्या हद्दीतील फिस्की परिसरात जंगलाला आग लागून शेकडो एकर वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. सातत्याने लागणा-या वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना केली जात नसल्याने येथील शेकडो हेक्टरवरील वनसंपदा धोक्यात आली आहे. वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तींची तर हानी होतेच आहे. मात्र जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
सालेभट्टी, पिसगाव, वडगाव, मांगरूळ, वरूड आदी पसिरारत फिस्कि जंगलाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी परिसरामध्ये आग लागून गवत, झुडपे, साग, शिसम, खैर, कडुनिंब, बाभूळ व इतर झाडे जळून खाक होतातच. वन्यप्राण्यांचाही अधिवास आगीमुळे नष्ट होतो. परिणामी मोर, हरिण, चितळ, सांबर, ससा असे जंगली प्राणी व पक्षी या परिसरातून इतरत्र स्थलांतर करतात. तसेच परिसरातील वाळलेली झाडेझुडपे, गवत, पालापाचोळा, जवळपास जलस्त्रोतांचा अभाव व वाहणारे वारे आदी कारणामुळे आग लागल्यानंतर आटोक्यात आणणे कठीण होते. त्यामुळे जंगलाला आग लागू नये किंवा आग लागली तरी तेवढ्या परिसरापुरती मर्यादीत राहावी यासाठी मारेगाव वनविभागाने परिणामकारक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
