
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
अपघातांची शृंखला राळेगाव तालुक्यात अव्याहत सुरु आहे. यवतमाळ वडकी महामार्गावर राळेगाव प. स. समोर भरघाव येणारी कार डिवायडर वर धडकली आणि रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या दोन निष्पाप जीवांचा करून अंत झाला. काल ( दि. 11) सायं. 7:30 च्या दरम्यान ही घटना घडली . वीरेंद्र गहलोत( 36) व रामाजी जुनघरे (65 ) असे मृतकाचे नाव आहे. यवतमाळ कडून येणारी कार क्र. MH-03 BC2088 या वाहनाच्या धडकेत वीरेंद्र गहलोत हे जागीच ठार झाले तर रामाजी जुनघरे यांचा यवतमाळ शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेची चोकशी होऊन सत्य काय ते बाहेर येईलच मात्र सकृत दर्शनी जो आक्रोश वेक्त होतोय तो आपली सार्वजनिक वेवस्था व नियोजनशून्य कारभार याचे वाभाडे काढणारा आहे. राळेगाव शहरात आज पर्यंत डिवायडर व अरुंद रस्त्यामुळे मृत्युमुखी पडल्याची ही पाचवी घटना आहे. या आधी एक वृद्ध महिला, दिवाळीच्या दिवशी एक सतरा वर्षीय मुलगी, एक इसम व आता हे दोन मृत्यू अशा सातत्याने मृत्यू च्या अपघाती घटना घडतं आहे. यवतमाळ वडकी महामार्ग हा राळेगाव शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून जातो. या रस्त्यावर खरेदी विक्री संघ, वसंत जिनींग, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती व पुढे प्रशासकीय कार्यालय असे सतत वर्दळ असणारे नागरिकांची कायम ये-जा असणारे ठिकाण आहे. एव्हढेच नाही तर कायम गर्दी ने गजबजलेळे रावेरी पॉइंट हे ठिकाण देखील याच रस्त्यावर येते. इतकेच नाही तर शुक्रवार बाजारात देखील याच रस्त्यावरून जावे लागतं असल्याने सतत गजबजलेला भाग असतो. कोणत्याही शहरातुन जाणारा टू वे रस्ता जेव्हा शहरातुन जात असतो तेव्हा फोर वे बनवण्यात येतं असतो. त्याचे कारणच हे असते कीं शहरातील वर्दळी मुळे अपघात होऊ नये या करीता गावातून रस्ता रुंद करण्यात येतो. राळेगाव मात्र याला अपवाद आहे. बाहेरून येणारा टू वे रस्ता गावातून देखील टू वे होऊनच बाहेर पडतो. या मुळे अपघाताच्या संख्येत वाढ होते. दिलीप बिल्डकॉन ने या रस्त्याचे कामं केले आहे. बाहेरून येणारी वाहने शहरातून देखील भरधाव निघतात हे वास्तव आहे. आठवड्याभरा आधी डिवायडर च्या दोन टोकांना दोन ट्रक धडकल्याची घटना घडली. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच काल दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. काल शेतातून कामं आटोपून वीरेंद्र गहलोत व रामाजी जुनघरे हे घराकडे ( राळेगाव ) निघाले होते. वीरेंद्र यांना कॉल आल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांचे जवळच रामाजी जुनघरे उभे होते. यवतमाळ कडून येणारी कार चालकाचे नियंत्रण सुटून थेट डिवायडर ला धडकली व लगत उभे असणाऱ्या वीरेंद व रामाजीच्या अंगावर कोसळली. डोक्याला जोरदार मार बसल्याने वीरेंद्र यांचा जागीच मृत्यू झाला तर रामाजी देखील रुग्णालयात गतप्राण झाले. राळेगाव पोलीस या अपघाताला जबाबदार कोण याची चोकशी करीत आहे. मात्र काहीच दोष नसतांना ज्यांचा यात बळी गेला त्यांचे काय. राळेगाव शहरात वीरेंद गहलोत हे सुस्वभावी वेक्ती म्हणून ओळखल्या जात होते. आज तरुणपणी त्यांना अपघाती मृत्यूला समोर जावे लागले. त्यांच्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला तो वर्णनातीत आहे . रामाजी जुनघरे हे देखील एक सालस, निर्गवी वेक्तिमत्त होते. मामाजी म्हणून सम्पूर्ण गावात त्यांची ओळख होती.आज होते व आता गेलें ही विषन्न करणारी हळहळ तालुक्यात चर्चेचा विषय झाली आहे. मात्र या मृत्यू नंतर अरुंद रस्ता, डिवायडर व भरधाव वाहन चालवणारे चालक यांचेवर नियंत्रण राखायला हवे. आणखी किती बळी घेतल्या नंतर या प्रश्नाचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल अशी संतापजनक प्रतिक्रिया वेक्त होतं आहे.
