
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब ते यवतमाळ रस्त्यावर असलेल्या जगदंबा फार्मसी महाविद्यालयाच्या इमारतीवरील संरक्षक (पॅराफीट) भिंत कोसळल्याने दोन विद्यार्थिनी व एक विद्यार्थी असे तिघे जण जखमी झाले. ही घटना २६ मे रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. कळंब येथील जगदंबा फार्मसी महाविद्यालय उन्हाळ्यामुळे सकाळी ८.३० ते २ वाजेपर्यंत सुरू असते. सदर महाविद्यालयात इमारतीवरील संरक्षक भिंतीचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी टेकून उभे होते. त्याचवेळी मुली खालून चालत निघाल्या असता संरक्षक भिंतीच्या सिमेंट काँक्रीटच्या विटा खाली पडल्याने सुरज राजू देवळे (१९, रा. कळंबा महानी, डी.फार्म.) याचा हात फ्रॅक्चर झाला, तर खाली उभ्या असलेल्या विद्यार्थिनी प्रणिता नीळकंठराव कुळसंगे (१९, रा. दोनोडा, डी.फार्म.) व गायत्री संतोष चौधरी (१९, द्वितीय वर्ष बी.फार्म, रा.भोगाला, ता. पुसद) यांच्या अंगावर कोसळल्या. यात विद्यार्थिनींच्या कमरेला व डोक्याला मार लागला, कर्मचाऱ्यांनी जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले.
