
अनेक घरात शिरलं पुराचे पाणी
माजरी-सद्या सर्वत्र अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान लोअर वर्धा या धारणाचे तब्बल ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी माजरी परिसरातील शिरना, कोराडी व वर्धा या नद्यांना मोठे उधाण आले आहे. सदर नद्यां धोक्याची पातडी ओलांडल्याने पुराचा पाणी अनेकांच्या घरात शिरले आणि हाहाकार उडाला. शिरना , कोराडी, वर्धा या नद्यांचे पाण्याची पातळी सोमवारी मध्यरात्री पासून अचानक वेगाने वाढल्याने माजरीच्या तेलुगु दफाई, आंबेडकर वार्ड, शांती कॉलोनी, चैतन्य कॉलोनी, दफाई .१नं, एकता नगर या वस्तीत शिरल्याने नागरिकांना घरगुती समान बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पुर पीडित नागरिक घरातील समान व जीवनावश्यक वस्तुसह नेहरू क्लब व सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. दरम्यान काही नागरिकांनी वेकोलिच्या रिकामी क्वार्टर व महावीर शाळेत आश्रय घेतला आहे. दरम्यान वेकोलि प्रशासन नागरिकांच्या मदतीला पुढाकार घेत वेकोलिचे सामुदायिक भवन नेहरू क्लब येथे पुर पीडित नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची व वैद्यकीय सेवेची निःशुल्क व्यवस्था केली आहे.
पूरामुळे पळसगाव,पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा, माजरी वस्तीसह अनेक गावात पाणी शिरलय.
या पावसाचा फटका शेतपिकाला बसला असून या परिसरातील शिरना, कोराडी व वर्धा या नदीकाठच्या गावांच्या हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. यंदा पहिल्यांदाच माजरी वस्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस ठाण्यापर्यंत पुराचा पाणी पोहोचला.
नद्यांच्या पूरामुळे या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे पर्यायी रस्ता नसल्याने वेकोलिचे कामगार सुद्धा कामावर पोहोचले नाही.म्हणून वेकोलिच्या खाणी सुद्धा बंद आहेत.
प्रशासकीय अधिकारीसुद्धा पुरपरिस्थितीची खरी माहिती नागरिकांना देत नाही. नद्यांचे पाणी सतत वाढत असल्याने परिसरातील नागरिक चिंतेत सापडले आहे. या पुरामुळे परिसरात हाहाकार उडाला असून १९९४ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती झाल्याची वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी भद्रावतीचे तहसीलदार यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही
बॉक्स
कोराडी नाल्यात मोठे उधान आल्याने पळसगावच्या आतमध्ये पाणी शिरले. काही नागरिक पुरात अडकले होते. दरम्यान चंद्रपुर येथून बचाव पथक दाखल होवून पुरात अडकलेल्या पुरपीडितांना सुरक्षित बाहेर काढले.
