गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी या साठी माजी सैनिक महादेव गजें पाटील आमरण उपोषणावर

यवतमाळ जिल्ह्यात पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांची मात्र बिकट परिस्थिती झाली आहे .आधीच शेती घाटयात असताना असं अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.त्यात या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडली नाही असेच दिसत आहे.धनुष्यबाण कोणाचा यावर भांडणारे शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार या वर जरा प्रश्नच आहे.अतिवृष्टीने शेतीची नासाडी अन्
घरांची पडझड होऊन झालेल्या नुकसानीमुळे सर्वसामान्य नुकसानग्रस्तांचा जीव टांगणीला लागला आहे.सातत्याने नैसर्गिक संकटे पेलणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामाची तयारी केली होती. यावर्षी भरपूर पाऊस होईल असा अंदाज सुरुवातीपासूनच वर्तविण्यात येत होता. मात्र ऐन पेरणीच्या काळात पाऊस पडला नाही तरी, काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तर काहींनी अल्पशा पावसावर खरिपाची पेरणी उरकली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उभे टाकले होते. दरम्यान जुलैच्या दुसऱ्या सप्ताहात सुरू झालेल्या पावसाने सर्वांचे अंदाज चुकवित अतिवृष्टीचा कहर केला.हजारो हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले असावे. त्या सोबतचजिल्हाभरातील जवळपास पाचशे ते सहाशे घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाल्याचा अंदाज आहे. शेतीसह घरांचे असे दुहेरी नुकसान झालेल्यांने संसार उघड्यावर पडले आहेत. यातून सावरण्यासाठी आता नुकसानग्रस्तांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या असल्या तरी सरसकट नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

शासनाकडून मात्र कोणतीही मदत अजून पोहचलेली नाही त्यामुळे सर्व शेतकरी व सामान्य नागरिक हाल अपेष्टा सहन करत जीवन जगत आहे.जर शासनाने त्वरित मदत नाही दिली तर शेतकरी आत्महत्या वाढणार आणि त्या आत्महत्या ना शासनच जबाबदार राहणार. शेतकऱ्यांवर सध्या कर्जाचा खूप मोठा बोजा आहे .सहानुभूतीने विचार करून पूर बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी या साठी माजी सैनिक महादेव गजें पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहेत.या आमरण उपोषणाची माहिती पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते ,जिल्ह्याच्या खासदार ,जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री ,पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे.