
पोंभुर्णा प्रतिनिधी : आशिष नैताम
पोंभुर्णा तालुक्यातील भिवकुंड परिसरात अवैध रेतीघाट तयार करून प्रशासनाच्या डोळ्यादेखत खुलेआम अवैध रेती उपसा सुरू असून बेकायदेशीर रेती उत्खनन व वाहतूक प्रचंड प्रमाणात सुरू आहे. शासनाची कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेला हा गैरव्यवहार म्हणजे थेट शासकीय महसुलाची लूट असल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल विश्वनाथ वाकडे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.
रेती माफियांनी नदीपात्र उद्ध्वस्त केले असून पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आणले आहे. अवजड वाहनांची बिनधास्त वाहतूक सुरू असून रस्ते उखडले गेले आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असा थेट इशारा वाकडे यांनी दिला आहे. अवैध रित्या उपसा केलेल्या शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे पहावयास मिळत असून
या गंभीर प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याने रेती माफियांचे फावले आहे. एकीकडे तालुका प्रशासन सांगते, जागा यापूर्वीच एनए केलेली आहे. जागा वैध रेती साठ्यासाठी एनए केली जाते, मग या जागेवर असलेला रेतीसाठा नेमका कोणाचा? याचे उत्तर आजतरी महसुल प्रशासनाकडे नाही. पोंभूर्णा महसुल प्रशासन हा रेतीसाठा जप्त करायची हिंमत का करत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. अवैध रेतीघाटामधून उपसा केलेला रेतीसाठा वैध कसा, याचे समाधानकारक उत्तर आजतरी पोंभूर्णा महसुल प्रशासनाकडे नाही.
कायदा व सुव्यवस्था मोडीत निघाली असून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.भिवकुंडसह संपूर्ण पोंभुर्णा तालुक्यातील सर्व अवैध रेती घाट तात्काळ बंद करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक अतुल वाकडे यांनी केली आहे.
कारवाई झाली नाही, तर पुढील काही दिवसात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन, रास्ता रोको आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील, असा अंतिम इशारा नगरसेवक अतुल वाकडे यांनी दिला आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
