
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव : सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श उपक्रम रवींद्र महाजन मित्र मंडळ व महाकाल ग्रुपच्या वतीने राबविण्यात आला. रवींद्र महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, राळेगाव येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले तसेच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता रुग्णांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयास कूलर भेट देण्यात आला.यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यातून आनंद साजरा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत माऊली वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवत त्यांना प्रेमाने जेवण वाढण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. समाजातील वंचित घटकांप्रती कृतज्ञता व संवेदनशीलता जपण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सुविधा वाढविण्यासाठी अशा प्रकारचे सहकार्य आवश्यक असून, मित्र मंडळ व महाकाल ग्रुपने घेतलेला हा पुढाकार निश्चितच स्तुत्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमात रवींद्र उर्फ भोला दादा महाजन व महाकाल ग्रुपच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग लाभला. युवकांनी सामाजिक जाणीव ठेवत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्र मंडळातील अध्यक्ष मंगेश उईके, सौरभ गेडाम, शंकर शिरसागर, सुरज जुनघरे, राहुल गाडगे, विकी इंगळे, सचिन झाडे, निखिल कोवे, शरद नेहारे, सागर पावडे, प्रेम जुनघरे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी रुग्णालय प्रशासनानेही आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
