
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या ‘आकासा एअर’ या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते.
राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, ” “राकेश झुनझुनवाला एक ध्येयनिष्ठ, पराभूत न होणारी व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आर्थिक जगामध्ये अमिट ठसा उमटवला आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
कमी वयात करिअरची सुरुवात
5 जुलै 1960 ला जन्मलेले झुनझुनवाला मुंबईत लहानाचे मोठे झालेले आहेत. त्यांचे वडील प्राप्तिकर खात्यात अधिकारी होते. किशोर वयातच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडं त्यांचा ओढा वाढला. दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, याकडं लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचे वडील त्यांना द्यायचे, असं सांगितलं जातं.
चार्टर्ड अकाउंटंसीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार बोलून दाखवला. त्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्याकडून किंवा मित्रांकडून पैसे मागयचे नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. शेअर बाजाराच्या व्यवसायात यश आलं नाही, तर त्यांना चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनही करिअर करता येऊ शकतं, असंही सांगितंल.
राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या 5,000 रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली, असं सांगितलं जातं. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती आज 6 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 45,328 कोटी रुपयांची आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची सर्वाधिक किंमत असलेली गुंतवणूक ही घड्याळं आणि दागिने तयार करणारी कंपनी टाटा समुहाच्या टायटन कंपनीमध्ये आहे. तसंच स्टार हेल्थ इन्श्युरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि कॉनकॉर्ड बायोटेक सारख्या कपन्यांमध्येही झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे.
1986 मध्ये झुनझुनवाला यांनी एका कंपनीचे 5,000 शेअर खरेदी केले. त्यांनी हे शेअर प्रत्येकी 43 रुपयांनी खरेदी केले होते. पण तीन महिन्यांत या शेअरचं मूल्य वाढून 143 रुपये झालं होतं. एवढ्या कमी काळात तीनपटीपेक्षा अधिक परतावा मिळाल्यानं झुनझुनवाला यांच्यासाठी हा अनुभव यशाची पहिली पायरी चढण्यासारखा होता.
