
ढाणकी/प्रतिनिधी :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देश आनंदोत्सवात न्हाऊन निघत असताना स्वातंत्र्यदिनी ढाणकी शहरात अजबच प्रकार घडला.
चक्क १५ ऑगस्ट च्या दिवशी ढाणकी येथील युनियन बँकेच्या शाखेने ध्वजारोहणच केले नसल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच ढाणकी येथील जागरूक नागरिकांनी त्वरित शाखेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, ध्वजारोहण झाले नसल्याचे लक्षात आले. तेव्हा तातडीने शाखा व्यवस्थापकाशी संपर्क केला असता, आम्हाला ध्वजारोहण करा असे कुठलेही आदेश नसल्याचे शाखा व्यवस्थापक यांनी सांगितले. आमची शाखा ही भाडेतत्त्वावर या ठिकाणी असून शासकीय ठिकाणी नसल्यामुळे ध्वजारोहण केले नाही. शाखेच्या झोनल विभागात ध्वजारोहण होत असते. याबाबत कुठला आदेश किंवा जीआर आहे का? अशी विचारणा केली असता शाखाव्यवस्थापक निरुत्तर झाल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात हर घर तिरंगा अभियान हे यशस्वीपणे राबविल्या जात असून, केंद्रीय कृत असलेली युनियन बँकेची शाखा ध्वजारोहण करत नाही यास काय म्हणावे ?आणि ग्रामीण भागातील शाखांना ध्वजारोहण न करण्याचे आदेश हे कितपत योग्य ? इथे घराघरावर तिरंगा असताना शासकीय बँक ध्वजारोहण का करीत नाही ?यावर शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी या आशयाचे निवेदन भाजपा चे शहराध्यक्ष रोहित वर्मा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांना पाठविले असून, शासन, प्रशासन या गोष्टीची गंभीर दखल घेत युनियन बँक शाखा ढाणकी शाखा व्यवस्थापक यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
