ढाणकी येथील महावितरण चा सहाय्यक अभियंता निलंबित,शेतकऱ्यांच्या कोटेशन पैशावर डल्ला मारलेले प्रकरण

(

(

ढाणकी/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांच्या कोटेशन पैशावर डल्ला मारून आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी, महावितरणचा सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे याची पुसद येथील कार्यकारी अभियंता आणि सहकारी कर्मचारी यांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी तब्बल 13 तास विभागीय चौकशी केली होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच अभियंत्यावर निलंबनाची कारवाई झाली. महावितरण मध्ये होत असलेल्या आर्थिक घोटाळ्याची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहोचल्याने, अभियंता योगेश ठाकरे यांची विभागीय चौकशी झाली होती, माझी चौकशी का केली? म्हणून, चौकशी अधिकाऱ्याला आत्महत्या करण्याची धमकी सहाय्यक अभियंत्याने दिली होती. तेव्हा सहाय्यक अभियंता विरोधात कार्यकारी अभियंता पुसद यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार सुद्धा दिली. या सर्व घडामोडी मध्ये एका लाईनमनचा मात्र हकनाक बळी गेला. स्वतःला वाचवण्याकरिता अभियंता योगेश ठाकरे यांनी खरुस फिटर वरील लाईनमन यांचा बळी दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. लाईनमन यांनी शेतकऱ्याचे कोटेशन पैसे घेऊन, रीतसरपणे ऑफिस मधील कर्मचाऱ्याला दिले. ऑफिस कर्मचाऱ्यांनी लाईनमन यांनी दिलेले पैसे घेऊन, पावती दिली. याची शहानिशा न करता पावत्या शेतकऱ्याला दिल्या, एवढ्यावरून लाईनमन यांना निलंबित केले असल्याने, नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एखादा कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेले काम करतो, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेचे पालन केल्यामुळे जर एखादा कर्मचारी निलंबित होत असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे घोटाळा करणारे अधिकारी यांच्यावर झालेली कारवाई ही योग्यच असून, कर्मचारी लाईनमन यांचा मात्र हकनाक बळी गेल्याने जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.