
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शेतकऱ्याच्या शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुख समृद्ध व्हावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून शासनाने बेंबळा प्रकल्पाचे माध्यमातून राळेगाव तालुक्यात व इतरही तालुक्यात मध्यम प्रकल्पासोबत लघु प्रकल्पाची निर्मिती करून कालवे खोदले. परंतु या खोदलेल्या कालव्यांचे नियोजन व्यवस्थित होत नसल्यामुळे या कालव्यामुळेच शेतात जाणारे रस्ते बंद होऊन शेतात पाणी साचून अनेक शेतजमिनीवरील पिके नेस्तनाबूत होत आहे. मात्र या बाबीकडे बेंबळा प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे सपेशल दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचून सिंचन व्हावे म्हणून बेंबळा प्रकल्पाचे लहान-मोठे कालवे खैरी परिसरातील अनेक शेतातून खोदण्यात आले. मात्र कालवा खोदकाम करताना शेतकऱ्यांच्या आणि ज्या शेतात कालवा खोदला आहे त्या शेताचा कसलाही विचार न करता कालवा खोदण्याचे काम केल्याचे दिसून येते. तसेच पाटसरी काढताना पाटसरीचे काम नियोजन शून्य केल्याचे दिसते. कारण पाटसरीचा शेवट हा कोणत्या नाल्यात किंवा नालित केला जातो जेणेकरून शेवटचे जाणाऱ्या पाण्यामुळे कुण्या शेताचे नुकसान होऊ नये. मात्र खैरी परिसरात सध्या चालू असलेल्या बऱ्याच शेतातील पाटसरी ही कुठलेही नाली किंवा नाल्यात न काढता कुठे पांदण रस्त्यावर तर कुठे कोणाच्याही शेत शेजारी खोदकाम करून सोडून दिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा सिंचनाचे वेळी ह्या पाटसरीच्या नियोजन शून्य कामामुळे पाटसरी चा शेवट नाल्यात न केल्यामुळे ते पाणी इतरांच्या शेतात जाऊन शेतमालाचे नुकसान करीत आहे.
बेंबळा कालव्यांचे बऱ्याच ठिकाणी नियोजन शून्य काम झाले असून वीरूळ शिवारातील कालव्याचा शेवट चे खोदकाम पांदन रस्त्याजवळ खोदून सोडल्यामुळे ते कोणत्याही नालीकडे वळते न केल्यामुळे त्या कालव्याच्या पाण्याने वीरूळ शिवारातील सुमनताई इंगोले यांचे गट नंबर १९ मधील शेताचे खूप नुकसान झाले आहे तसेच खैरी वडकी रोडवरील बेंबळा कालव्यामुळे गट नंबर ३५२/२ संजय जगदरे या शेतकऱ्याचे सुद्धा बेंबळा कालव्याच्या नियोजन शून्य कामामुळे शेतातील पीक पाण्याखाली आले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत ची तक्रार केल्यास संबंधित विभाग तक्रारीची कोणतीही दखल घेत नाही व शेतकऱ्यांनी स्वतःहून नुकसान होऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्यास संबंधित विभागाकडून कार्यवाहीची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे खैरी परिसरातील शेतकरी बेंबळा कालव्यांच्या नियोजन शून्य कामाच्या समस्येमुळे त्रस्त असून या कालव्यांमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
खैरी परिसरातील बेंबळा कालव्यांचे बांधकामही बऱ्याच ठिकाणी निकृष्ट झाल्याचे दिसते. बऱ्याच बांधकामाच्या लाइनिंग ला तडा गेल्याचे दिसते. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक पूर्ण झालेल्या पाटसऱ्याचे पाणी पाटसरीचे काम पूर्ण होऊनही शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही हे वास्तव आहे. बऱ्याच ठिकाणच्या पाटसऱ्या नियोजन शून्य कामामुळे जिथे लायनिंग ची आवश्यकता आहे तिथे सिमेंट काँक्रीटच्या लाइनिंग न झाल्यामुळे फुटून तेथील पाणी दुसऱ्या शेतकऱ्याचे शेतात शिरून शेतकऱ्यांचे शेतमालाचे नुकसान होत आहे मात्र याकडे बेंबळाच्या संबंधित विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे हे बेंबळा कालवे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
[गट क्रमांक ३५२/२ हे पाच एकर शेत माझे असून त्यामध्ये आम्ही तीन हिस्सेदार आहोत. बेंबळा कालव्यांच्या नियोजन शून्य कामामुळे माझे संपूर्ण पाच एकर जमीन पाण्याखाली जात असते. माझ्या शेत शेजारी बेंबळा कालव्याचा पूल बांधण्यात आला असून तो खैरी वडकी रोडवर आहे त्या पुलामुळे माझ्या शेताचे कोणतेही नुकसान होत नसून रोडच्या नाल्याचे पानी जाण्यासाठी बेंबळा प्रकल्प विभागाने मोठे पाईप टाकण्याऐवजी छोटे पाईप टाकल्यामुळे ते पाणी त्या पुलाचे टाक्यात पास होणे ऐवजी ते पाणी माझे शेतात येतात. याची वारंवार बेंबळा प्रकल्प विभागाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने अजून पर्यंत त्याची दखल घेतली नाही दखल घेतली नाही म्हणून मी आता विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे त्याची तक्रार केली आहे की माझ्या तक्रारीची दखल घेऊन माझ्यावर उपासमारीची वेळ येऊ देऊ नये अशी तक्रार दाखल केली आहे
शेतकरी
संजय डोमाजी जगधरे
शेती गट नंबर ३५२/२
