
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आज रोजी आधुनिकतेच्या युगात मोबाईल-क्रांतीमुळे जग जवळ आले आहे, परंतु याच मोबाईल संस्कृतीमुळे मात्र माणसा माणसातील नाते दुरावत चालले आहे. मोबाईलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. मोबाईलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे, परंतु माणसांना एकमेकांजवळ बसून बोलायला वेळ तेवढा मिळतांना दिसून येत नाही. मोबाईल, कॉम्प्युटर आणि दुरचित्रवाणीमुळे नात्यातील जिव्हाळा दुरावला असल्याचे विचित्र चित्र आज सगळीकडेच दिसत आहे. नात्यातील ओलाव्यासह या मोबाईल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, टॉर्च, कॅलक्युलेटर, रेडीओ या वस्तुंचे महत्व देखील कमी केले आहे.
आधी विविध धार्मिक सोहळे, तसेच घरगुती छोट्या-मोठ्या समारंभाचे फोटो कॅमेऱ्याने टिपून जतन करून ठेवले जायचे, परंतु आता मोठ्या मेगापिक्सलचे मोबाईल हातात आल्यापासून कॅमेरा हद्दपार झाला आहे.एकेकाळी हाताल घड्याळ असणे.प्रतिष्ठेचे मानले जायचे. आता मोबाईल मध्येच घड्याळ असल्याने हाताला घड्याळबांधण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आता कुणी वेळ विचारली की हाताकडे न बघता थेट खिशातून मोबाईल काढून वेळ पहिली जाते. आता तर छोट्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या पत्रिका न छापता मोबाईलवरून एस. एम. एस. किंवा व्हॉटस् अप व्दारे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले जात आहे. मोबाईलमुळे आजा पत्रलेखनीही कमी झाले आहे. त्यामुळे थोरा मोठ्यांना लिहायच्या पत्रातील मजकूर सुध्दा आजच्या पिढीला माहित नसल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण भागात पुर्वी करमणुकीचे साधन म्हणजे रेडीओ होता. या रेडीओला पहिल्यांदा दुरचित्रवाणीने व आता मोबाईलने अडगळीत पाठविले आहे. मोबाईल मध्येच गाणे ऐकणे व चलचित्र पाहण्याची व्यवस्था असल्याने रेडीओ, टेपरेकॉर्डर आणि आता दुरचित्रवाणीकडेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. जो तो एकूणच मोबाईलमध्ये मान वाकवून असल्याने घराघरातील संवादही हरवत चालले आहे. अगदी लहानपणापासूनच मोबाईल हातात आल्याने लहानमुले मैदानी खेळांपासून दुरावली आहे. सतत मोबाईलवर राहात असल्याने ती एकलकोंडी होतांना दिसून येत आहे. मानवी जीवन क्रांती करून गतिमान बनविणे आवश्यक असले तरी घरातल्या नात्यांपासून आपण दुर होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत जरूरीचे आहे. हे देखील तेवढेच सत्य आहे.
