सीईटी परीक्षेत प्राजक्ताने एस सी कॕटगिरीतून 99.99% मार्क मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम ,प्राजक्ता लिहितकर जि. प. विद्यार्थ्यांसाठी आदर्श

प्राजक्ता प्रकाश लिहितकर हिने नुकत्याच पार पडलेल्या नीट व सीईटी परिक्षेत घवघवित यश संपादन केलेले आहे . तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा भेंडाळा , बीट शेगाव , पं. स. वरोरा इथे झाले असून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावाजवळच्याच शेगाव येथिल संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालयात पार पडलेले आहे . इयत्ता बारावीला ती वरोरा येथिल दिशा एज्यूपाॕईन्ट येथे शिकत होती . सीईटी परीक्षेत प्राजक्ताने एस सी कॕटगिरीतून 99.99% मार्क मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम स्थान पटकावून जि. प. विद्यार्थी सुद्धा इतिहास घडवू शकतात हे सिद्ध केलेले आहे . तिला नीट परिक्षेत 602 गुण मिळालेले आहेत .
आज भेंडाळा गावात तिच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिला तिच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकविणारे शिक्षक शिक्षिका व शेगाव बीटातील शिक्षकवृंद यांनी तिचा शाॕल श्रीफळ देऊन सन्मान केला . त्यावेळी तिला शिकविणारे प्रकाश वर्भे सरांनी आपल्या मनोगतात सांगितले की अगदी लहाणपणापासूनच प्राजक्ता अभ्यासात तल्लख होतीच शिवाय तिचे एम फिल असलेले शेतकरी वडील प्रकाश लिहितकर व बीए पर्यंतचे शिक्षण असलेली तिची आई यांचे तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष असायचे . सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ती नेहमीच अव्वल असायची असे ते म्हणाले , यावेळी उपस्थित असलेले गोपाळ गुडधे सर म्हणाले की प्राजक्ता तू जि. प. शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठेवलेला आहे . तुझ्या यशामुळे निश्चितच जि. प. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व सोबतच जि. प. शाळांमध्ये शिकविणा-या शिक्षकांचाही उत्साह वाढणार आहे व त्यातून यापुढेही अनेक प्राजक्ता घडविल्या जाव्यात यासाठी शिक्षक प्रयत्न करतील . अजय भगत सर म्हणाले की प्राजक्ता तू केवळ जि. प. विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर समाजबांधवांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे .
यावेळी तिला शिकविणारे प्रकाश वर्भे , कल्पना भित्रे यांच्यासोबतच गोपाळ गुडधे , संजय जांभुळे , अजय भगत , चंद्रकांत धकाते , गजानन नवघरे , मुन्ना डेकाटे , नितीन पुसाटे , भाऊराव बागे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजू जांभुळे यांनी तर आभार गजानन नवघरे यांनी मानले .