परतीच्या पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी,दराटी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

 ढाणकी प्रती – प्रवीण जोशी

 सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती या अस्मानी संकटाचा सामना करताना मेटाकुटीस आलेल्या दराटी येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन दिनांक सात आक्टोंबर रोजी दुपारी आपली जीवन यात्रा संपविली.लक्ष्मण एकनाथ घुले वय 60 वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच दराटी पोलिस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून शव ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले.

घटनेची सविस्तर वृत्त असे की मृतक घटनेच्या दिवशी आपल्या शेतातील शेती कामे करत होता. त्याच्या धुऱ्याला लागून असलेल्या शेतात त्यांचा बबन घुले नामक पुतण्या कापलेल्या सोयाबीन पिकाची गंजी लावत होता. त्याच्यासोबत परतीच्या पावसाने पिकांची मोठी हानी झाली. लागवडीचा खर्चही यावर्षी निघत नसल्याचे चित्र होते. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत तो मनाशी बोलून तिथून निघून गेला. नाल्याच्या काठाला लागून असलेल्या बाभळीच्या झाडाला त्याने गळफास घेतला. त्याचा ओरडण्याचा आवाज येतात पुतण्या बबन घुले यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतक लक्ष्मण लटकलेल्या अवस्थेत बबनला दिसला. ही वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरली व बघता बघता बरीच गर्दी घटनास्थळी जमा झाली. पुतण्या बबन घुले यांनी पोलीस स्टेशन दराटी येथे फिर्याद दाखल केली व पुढील तपास ठाणेदार भरत चपाईतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी  केंद्रे करत आहेत.