ई पीक पाहणी नोंदणीला तारीख पे तारीख ई पीक पाहणी नोंदणीला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सातबारा २०२२ ते २०२३ वर्षाची ई पीक पाहणी नोंदणी साठी महसूल खात्याकडून तारीख पे तारीख देण्यात येत असून या ई पीक पाहणी ला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद असल्याने शासनाच्या महसूल विभागाने आणखी ई पीक पाहणी नोंदविण्याची अखेरची तारीख २२ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मागील वर्षीपासून शासनाच्या माध्यमातून सातबाऱ्या वर मोबाईल मधील ॲप च्या साह्याने ई पिक पाहणी करण्यात आले होते त्याचप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे जर शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर पीक पेऱ्याची नोंद झाली नाही तर सातबाऱ्या वरचा तो रखाना कोरा राहणार असल्याने भविष्यात येणाऱ्या योजनेपासून ते शेतकरी वंचित राहणार आहे तसेच पिक विमा भरपाई साठी शेतकऱ्यांनी मोबाईलवरून आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या वतीने आतापर्यंत तीनदा ई पीक पाहणी नोंदणी करिता मुदतवाढ दिली असली तरी अद्यापही तालुक्यातील ५०% शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसल्याचे आढळून आले आहे तालुक्यात एकूण जवळपास २७ हजार ५१५ खातेदार असून ई पीक पाहणी नोंदणीचे क्षेत्र २४५०३ हेक्टर एवढे असून आत्तापर्यंत फक्त १२१६७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शासनाने या अगोदर ई पीक पाहणी नोंदणी करिता ३० सप्टेंबर ही मुदतवाढ दिली होती मात्र शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी न केल्याने ही मुदतवाढ १५ ऑक्टोंबर पर्यंत तर वाढविण्यात आली मात्र १५ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात नोंदणी न केल्याने आणखी ई पीक पाहणी साठी २२ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ई पीक पाहणी नोंदणी करिता अनेक शेतकऱ्याकडे मोबाईल नसला तर दुसऱ्याच्या मोबाईलवरून ई पिक पाहणी नोंदविता येते मात्र काही शेतकऱ्यांना मोबाईलच हाताळता येत नाही तर काहीना ई पिक पाणी काय हेच माहित नाही अशा अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने शेतकऱ्यात प्रचंड उदासीनता आहे त्यामुळे या नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने आता २२ ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी नोंदणी करता येणार असून नोंदणी न केल्यास त्यांना अनेक अडचणींला समोर जावे लागणार आहे