
.
ढाणकी प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी येथे नगरपंचायतच्या विविध कामाच्या उद्घाटनासाठी लोकप्रिय आ. नामदेव ससाणे आले होते यावेळी ठरलेल्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर आमदारांनी प्रशासकीय पातळीवरील सर्व घडामोडीचा आढावा घेतला. तसेच ढाणकी शहराची पाणी समस्या हे गेल्या अनेक दिवसापासून ची समस्या आहे व असे असताना नवीन पाईपलाईनचे काम सुरू होत असल्याकारणाने पाणी समस्या दूर होण्यास मदत होईल त्या अनुषंगाने पाईपलाईनचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले व ढाणकी शहराची पाणी समस्या या पाईपलाईन मुळे सुटण्यास मदत होईल तसेच पाणी समस्या पूर्णपणे दूर करू असे आश्वासन सुद्धा आ. नामदेव ससाने यांनी दिले व तदनंतर स्थानिक चौकाला शहीद भगतसिंग चौक असे नामकरण सुद्धा करण्यात आले.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यावर उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर अधिकाधिक भरीव निधी टाकून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आ. नामदेव ससाने. यांनी दिली आहे. तसा बिटरगाव व ढाणकी परिसर अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी व बंजारा बहु ल भागामध्ये यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला अतिवृष्टी झाली. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन शेतकऱ्याच्या नदीकाठच्या शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या तर उरली सुरली कसर परतीच्या पावसाने काढून परिसरात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. यातून उरलेल्या पिकांपैकी थोडेफार व अल्प प्रमाणात हाती आलेला कापूस आणि सोयाबीन पिके पूर्णतः नष्ट झाली आहे. अशातच शासनाची देवू केलेली आर्थिक मदत व शेतकऱ्याचे झालेले अतोनात नुकसान भरून काढणारी नसून त्यांना योग्य आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधारची मदत देऊन त्यांना झालेल्या मानसिक खच्चीकरणातून बाहेर काढणे आता शासनाची जबाबदारी आहे.
त्यामुळे त्यांना शासनाकडून आणखी भरीव आर्थिक आधार मिळावा यासाठी पालकमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू व अधिकचे अनुदान तत्काळ मंजूर करण्याचा प्रयत्न करू असे यावेळी विद्यमान लोकनेते म्हणाले.
विशेष बाब म्हणजे ढाणकी व आजूबाजूच्या परिसरात सुरुवातीला अतिवृष्टीने तर परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे अतोनात हाल करून सोडले सोयाबीन ला तर जागेवरच कोंबे फुटले तर कापूस पिकावर करपा रोगाने अतिक्रमण केले आहे यामुळे कमालीचे उत्पन्न घटून आजच्या घडीला शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटल कापूस पीकत असलेल्या शेतामध्ये दोन ते तीन क्विंटल कापूस पिकावर समाधान मानावे लागत आहे. अशातच शासनाची भरीव मदतच शेतकऱ्याला वाचवू शकते. व शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करू शकते व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास शासनस्तरावर शक्य तेवढे प्रयत्न करू असे यावेळी आ. नामदेव ससाने म्हणाले.
