जि. प. शाळा वरध येथे विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव,वरध व सावरखेडा केंद्रातील शाळांचा सहभाग

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

वरध व सावरखेडा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरध येथे ८ ते ९ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व खेळ कौशल्याला वाव देण्यासाठी विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वरध व सावरखेडा केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेच्या केन्द्र स्तरावर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. कबड्डी, लंगडी, खो-खो व सांस्कृतिक कार्यक्रमात एकल नृत्य नाटिका, गायन आदी कार्यक्रम पार पडले, या विभागस्तरीय क्रीडा
व सांस्कृतिक कार्यक्रमात दोन्ही केंद्रातील केंद्र स्तरावर विजयी झालेल्या शाळांनी सहभाग घेतला. आनंदमय वातावरणात सर्व खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रक्रम क मध्ये इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रक्रम ब मध्ये इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी, लंगडी, खो-खो, १०० मीटर ,२०० मीटर ४०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, कॅरम, बुद्धिबळ योगासने हे खेळ तर सांस्कृतिक कार्यक्रमात एकलनृत्य, सामूहिक नृत्य, नाटिका व गायन आदी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमात दोन्ही केंद्रातील केंद्रस्तरावर विजेत्या शाळांनी सहभाग नोंदविला. क्रीडा प्रकारात झालेल्या खेळामध्ये कबड्डी या खेळात लोणी आठमुर्डी येथील शाळांचे संघ विजयी झाले. लंगडी या खेळात वरध आठमुर्डी शाळेतील
संघाचे वर्चस्व राहिले. तर खोखो मध्ये विहिरगाव शाळेने आपला विजय कायम राखला. वैयक्तिक खेळात चोंदी आठमुर्डी ,विहिरगाव, वरध ,सराटी व लोणी शाळांनी अव्वल स्थान मिळविले. सांस्कृतिक स्पर्धात सर्व शाळेतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्व प्रकारच्या खेळातील विजयी शाळेचे संघ हे आता पुढील तालुकास्तरीय खेळात सहभाग घेतील. यात केंद्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले. विजयी चमूचे व सहभागी संघाचे वरध व सावरखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख हरिदास वैरागडे व सतीश आत्राम केंद्र मुख्याध्यापिका विद्या काशेट्टीवर यांनी अभिनंदन केले आहे.. विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दोन्ही केंद्रातील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.