
जिल्हा प्रतिनीधी:यवतमाळ
प्रविण जोशी
महागांव तालुक्यातील फुलसावंगी परीसरात गनिमी काव्याने जिल्हाधिकारी यांनी मध्यरात्री अचानकपणे रेती तस्करीचा आढावा घेतला. या प्रकरणी संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्या नोटीसीला तलाठी मंडळाधिकारी यांनी उत्तर दिले. परंतु ते पूरक असून योग्य वाटत नाही असा शेरा मारून जिल्हाधिकारी यांनी फुलसावंगी व काळी टेंभी चे तलाठी आणि मंडळाधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली. परंतु निलंबन अन्यायकारक असून हे निलंबन बिनशर्त मागे घेण्यात यावे या मागणीसाठी तलाठी व मंडळाधिकारी यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात आंदोलनाचे टप्पे निर्धारित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. बिनशर्त निलंबन मागे घेण्यासाठी विदर्भ पटवारी संघ आणि मंडळाधिकारी जिल्हा शाखेचा सहभाग असल्याचे प्रसिद्धी पत्रातून सांगण्यात आले आहे. तलाठी फुलसावंगी आय.जि चव्हाण ,टेंभी चे तलाठी डी.बी.चव्हाण व मंडळाधिकारी पि.आर.कांबळे असे निलंबित करण्यात आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या प्रकरणात तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. असे असले तरी तलाठी व मंडळाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेती साठ्याची माहिती प्रशासनाला दिली होती. त्या रेती साठ्याचा जाहीरनामा काढून लिलाव करण्यात आला. त्यातून प्रशासनाला ४ लाख ९५ हजारांचा महसूल मिळाला असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पाहणीत हेच रेती साठी आढळून आला. ह्याच रेती साठ्याची पुन्हा जप्ती जिल्हाधिकारी यांनी केली. तत्पूर्वीच तलाठी व मंडळाधिकारी यांनी आपली जवाबदारी पूर्ण पाडली होती. असे असतानाही जवाबदारी पूर्ण केलेल्यांनाच दोषी ठरविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यावरून तलाठी व मंडळाधिकारी यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे हे निलंबन अन्यायकारक असून त्याविरोधात तलाठी व मंडळाधिकारी आंदोलनाच्या माध्यमातून पेटून ऊठले आहे. या प्रकरणात तिन्ही कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे या मागणीसाठी तलाठी संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरु केला. निलंबन मागे घेण्यात आले नाहीतर मंडळाधिकारी संघटना यामध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा संघटनेने दिला होता. तलाठी संघटनेने प्रशासनाच्या अन्यायकारक निलंबन विरोधात काळ्या फिती लावून काम चालवले. मात्र महसूल प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याने या आंदोलनात आता मंडळाधिकारी संघटना सहभागी झाली आहे. त्यामुळे आंदोलनाची धग आता जिल्ह्यात पोहचली आहे. आज तलाठी व मंडळाधिकारी संघटनेच्या वतीने महागांव सह जिल्ह्यात एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महागांव येथे सुरु असलेल्या आंदोलनाला कोतवाल संघटनेने पाठींबा दिला आहे. सोबतच धरणे आंदोलनास विदर्भ पटवारी संघटना नागपूर जिल्हाशाखा यवतमाळ चे संजय मारकंड यांनी मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलनात महागांव तलाठी संघटनेचे संचीव एस.वाय.रायपुरकर, उपाध्यक्ष एम.एम.शेख , मंडळाधिकारी आर.आर.पंडित,एम.आर.एकुलवार यांच्यासह आदी कर्मचारी यांचा समावेश आहे.
