

माहागाव तालुका प्रतिनिधी :संजय जाधव
शेतीच्या जून्या वादातून एका २५ वर्षीय युवकाने एका ३० वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या केल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजता दरम्यान तालुक्यातील दराटी पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अमडापुर गावच्या बस स्थानकावर घडली . या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे .
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश परशराम राठोड ( ३० ) रा . चिल्ली ( इ ) ता . महागाव असे मृतकाचे नाव असून कुंडलिक जांबवंत राठोड ( २५ ) रा भोजूनगर तांडा ता. उमरखेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . मागील काही वर्षापासून अमडापुर परिसरातील शेतीचा वाद होता . आज मृतकासमवेत अंदाजे ५ ते ६ जण त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गेले असल्याची माहिती असून याच दरम्यान वाद झाला . वादाचे रुपांतर हाणामारीत होत असतांना आरोपी कुंडलिकने धारदार चाकू मृतक प्रकाशच्या पोटात खुपसला . प्रकाशला उपचारासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाला . पोलिस पाटील अमडापुर यांनी घटनेची माहिती दराटी पोलिसांना कळविल्यावरून ठाणेदार भरत चपाईतकर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेत त्यास अटक केली आहे . या घटनेत किती आरोपी आहेत हे अजून निष्पन्न झाले नसल्याचे ठाणेदार भरत चपाईतकर यांनी सांगीतले असून पुढील तपास पोलिस करित आहेत .
