
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
अखंड मानव जात ही ईश्वराची लेकरे असून यात ईश्वराने कोणताही भेदभाव केला नाही. मात्र काही स्वार्थी लोकांनी समाजात ही धर्माची दरी आडवी करून माणसाला माणसाच्या विरोधात उभे केले. मात्र ही जातीयतेची भिंत पाडून हिंदू मुस्लिम बांधवांनी ढाणकी शहरात पुन्हा एकदा एकात्मतेचा संदेश दिला.
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदाय व हिंदूंचा मोठा सण. दिंडी द्वारे वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूर येथे जातात आणि एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परततात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून पंढरपूरला लौकिक मिळालेला आहे. तर बकरी ईद म्हणजे मुस्लिमांचा मोठा सन असून मुस्लिम बांधव या दिवशी कुर्बानी देऊन आपली अल्ल्हाह प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात . यावर्षी हे दोन्हीही मोठे सण एकाच दिवशी आलेत. मुस्लिम धर्मियांमध्ये कुर्बानी ही बकरी ईदच्या दिवशी दिली जाते तर हिंदू धर्मीयांमध्ये आषाढी एकादशीला उपवास असतात अशा या परिस्थितीमध्ये जातीय सलोखा कायम राहावा या उद्देशाने बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा आपला मानस सर्वांपुढे बोलून दाखवला आणि क्षणाचाही विलंब न लावता मुस्लिम बांधवांनी त्या कामी होकार दिला. ढाणकी शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य कमालीचे असून कधीही शहरात जातीय तेढ निर्माण होत नाही हे विशेष. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे शहरात कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया
मी एकादशीनिमित्त मुस्लिम बांधवांनी कोणतीही कुर्बानी देऊ नये याबद्दल माझे मत त्यांच्यासमोर मांडले. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देणे हे प्रत्येक मुस्लिम बांधवांना गरजेचे असतानाही त्यांनी सामाजिक सलोखा राहावा या उद्देशाने एकादशी च्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुठलीही प्रकारची कुर्बानी देणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो आणि असेच समाजामध्ये एकोपा राहावा ही विठुराया चरणी प्रार्थना करतो.
प्रताप भोस,
ठाणेदार, बिटरगाव पोलीस स्टेशन.
