
एकाच चितेवर आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून अखेरचा निरोप देण्यात आला. या हृदयद्रावक प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अंत्यविधीला जमलेल्या जमावाचे हुंदके अनावर झाले.अवघे निगनुर गाव या काळीज पिळवटणाऱ्या प्रसंगाने शोकमग्न झाले. सासरच्या जाचामुळे आयुष्याला कंटाळलेल्या रेशमा नितीन मुडे (२६) या विवाहितेने आपली दोन्ही चिमुकलो आपत्य अनुक्रमे कु. श्रावणी (६) आणि सार्थक (३) यांच्यासह आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. स्वतः विषाचा घोट घेत आईने दोन्ही निरागस लेकरांना विष पाजले. काल सोमवारी सायंकाळी निंगनुर येथे घडलेल्या या विदारक घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देश स्वातंत्र्य उत्सवाची तयारी करीत असताना पूर्वसंध्येला निंगनुर गावात हे आक्रीत घडले. या प्रसंगाने परिसरावर शोककळा पसरली आहे. एका आईने पोटच्या दोन गोळ्यांना घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. आज सकाळी उत्तरीय तपासणी करून तिन्ही मृतदेह निंगनूर येथे आणण्यात आले, तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. रेशमाच्या माहेरची मंडळी आणि आप्तेष्टांनी हंबरडा फोडला. या तिघांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेल्या सासरच्या क्रूरकर्म्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर आरोपी पती नितिन मुडे, सासरे किसन हेमला मुडे आणि सासू निर्गुणा किसन मुडे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध हुंडा आणि छळ केल्या प्रकरणी ४९८, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ आणि ३४ कलमा नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
साश्रू नयनांनी आई आणि चिमुकल्यांना शेवटचा निरोप
आई रेशमा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे काळीज हेलावले. आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, साहेबराव कांबळे, किशोर भवरे यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. निंगनुर येथे आज एकही चुल पेटली नाही. संपुर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. प्रत्येक जण या घटनेवर शोक व्यक्त करीत होता.
