चळवळी टिकणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.अशोक राणा
मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

वणी :- मतभेदांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीपूजेपेक्षा समाजोपयोगी विचारधारेच्या संवर्धनासाठी सामाजिक चळवळी टिकल्या पाहिजे, तरच समाजात शांतता, सुव्यवस्था नांदेल आणि विवेकी समाजाचं स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक तथा जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक राणा यांनी केले. ते धनोजे कुणबी सांस्कृतिक भवन येथे आयोजित मराठा सेवा संघाच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर सर होते.प्रमुख पाहुणे म्हणून क्रां.सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय वणीचे अध्यक्ष बाळासाहेब राजूरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत मांडवकर, ज्ञानेश्वर गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, सूरज खोब्रागडे, शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी, छत्रपती संभाजी महाराज बचत गटाचे अध्यक्ष सुरेंद्र घागे, मुक्ता साळवे महिला बचत गटाच्या अध्यक्ष सुनीता वागदरकर विचारपीठावर उपस्थित होते.दरम्यान मराठा उद्योजक कक्षाच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक नितेश ठाकरे, सचिवपदी संजय जेऊरकर यांना, तानूबाई बिरजे पत्रकार कक्ष अध्यक्षपदी शुभम कडू तर, मराठा आरोग्य कक्षाच्या अध्यक्षपदी माजी विस्तार अधिकारी अरुण डवरे यांची मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडची सभासद नोंदणी सुरु होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून मंगेश खामनकर यांनी मराठा सेवा संघाची आजवरची वाटचाल विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कडू, मारोती जिवतोडे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन मोवाडे यांनी केले.