

नगरपंचायत च्या बाजूने शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था
[.]
/ प्रतिनिधी :प्रवीण जोशी
यवतमाळ
नगरपंचायत होऊनही ढाणकीच्या समस्या ढाणकीकरांची पाठ मात्र सोडताना दिसत नाहीत. पुढची निवडणूक वर्षभराच्या फरकावर येऊन ठेपली, मात्र अजूनही येथील कोणत्याचं समस्येचं प्रॉपर निराकरण करण्यास, कुणालाही यश आलं नसल्याची नागरिक कुजबूज करत आहेत.
ढाणकी नगरपंचायत च्या बाजूने शहरात जाणारा मुख्य रस्ता, पावसामुळे घसरगुंडी झाला असून, बरेच बाईक स्वार या ठिकाणी पडून अपघात सुद्धा होत आहेत. एवढी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली असून, याकडे नगरपंचायत कधी लक्ष देणार? मुख्य म्हणजे याच रस्त्याने शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी बस स्टॉप वर येणं जाणं सुद्धा करतात. त्यांनाही हि समस्या दिसत नसावी का? आणि विशेष म्हणजे सदर रस्त्याच्या बांधकामाचे उद्घाटन, जवळपास वर्षभरापूर्वी उमरखेड-महागांवचे कर्तव्यदक्ष आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते झालं होतं. परंतु पुढे नेमकी अशी कोणती अडचण आली असेल? की अजूनही रस्ता “जैसे थे” चं परिस्थितीत आहे. उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात का नाही झाली? असा सवाल नागरिक करताना दिसत आहेत.
सद्यस्थितीत शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, गणपती विसर्जनाचा मिरवणूक मार्ग सुद्धा, खड्डे युक्त झाला असून, त्याची सुद्धा डागडुजी करण्याची नितांत आवश्यकता आहे. या वर्षी शहरातील गणेश मूर्ती भव्य असल्याकारणाने, रस्त्यावरील इलेक्ट्रिक वायर सुद्धा सुस्थितीत करणे महत्त्वाचे आहे. याही गोष्टीकडे नगरपंचायत व महावितरण यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.
नगरपंचायत कॉम्प्लेक्स मधील ड्रेनेज सिस्टीमचे तीन तेरा.
तसेच ढाणकी नगरपंचायत चे दुकान गाळे यामध्ये, थोडासा जरी जादा पाऊस झाला तर, पाणी दुकानात शिरते. पर्यायाने दुकानदारांचे नुकसान होते. यामुळे ग्राहक सुद्धा दुकानात जाण्यास धजावत नाहीत. या दुकान गाळ्यांच्या ड्रेनेज सिस्टीम चे अक्षरशः तीन तेरा वाजले असून, याकडे सुद्धा नगरपंचायत कधी लक्ष देणार? असा प्रश्न निर्माण होतो.
