अखेरचा हा तुला दंडवत.’..अन ‘तॊ’ सोडून गेला गावं
( आदर्श शिक्षकाच्या अपघाती निधनाने तालुक्यात हळहळ )

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

     

जगातील एकमेव अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. काळ, वेळ निश्चित झाल्यास मृत्यू च्या अक्राळ जबड्यातुन कुणाची सुटका नाही अशी वदंता हिंदू धर्मात आहे. हे त्रिकालाबाधित सत्य असलं तरी तरुण वयात झालेला अपघाती मृत्यू मानवी संवेदनेला धक्का देऊन जातोच. त्यातही एखाद्या कुटुंबाचा आधारवडच जेव्हा मृत्यू अकल्पितपणे हिसकावून घेतो

तेव्हा त्या कुटुंबावर झालेला आघात शब्दात मांडता येत नाही. राळेगाव तालुक्यातील चंद्रशेखर वानखडे या तरुण शिक्षकाचा मृत्यू याच पठडीत मोडणारा. त्याची ही एक्झिट अनेकांच्या डोळ्यातील अश्रूनं| वाट मोकळी करून देणारी ठरली.
सावनेर येथील चंद्रशेखर भैयाजी वानखडे या तीस वर्ष वय असणाऱ्या युवा शिक्षकाचे नुकतेच अपघाती निधन झाले.दुचाकीने यवतमाळ येथून गावाकडे येत असतांना कात्री गावानजीक रस्त्यावर उभा असलेला नादुरुस्त ट्रॅक्टर समोरून येणाऱ्या गाडीच्या प्रखर उजेडात दिसून न आल्याने त्यांना धडक बसली त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबातुन येणाऱ्या चंद्रशेखर यांनी अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गुणवत्तेच्या आधारे शिक्षकाची नोकरी मिळवली. चार बहिणी च्या पाठीवर सर्वात लहानभाऊ, पत्नी अडीच वर्षाची चिमुकली मुलगी वडील, विधवा बहीण यांचा आधार असणारा हा शिक्षक काळाच्या पडद्याआड गेला. विशेष म्हणजे कोरोना काळात आईचा देखील मृत्यू झाला होता.
आदर्श शिक्षक, स्पष्टवक्ता सहकारी, निर्व्यसनी, प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाण्याचा दुर्मिळ गुण ज्याच्या अंगी होता नियतीने त्याला अचानक जगातून उचलून नेले. शिक्षण, शेती, कुटुंब,गावं या विषयावरील त्याच्या स्वरचित कवितातुन तॊ भेटत राहिलंही मात्र लौकिर्थाने तॊ आता आपल्यात असणार नाही ही वेदना सुजाण नागरिकांना कायम अस्वस्थ करीत राहील.शोकसभेत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतांना या युवा शिक्षकाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक पतसंस्थाचे माजी अध्यक्ष राजूदास जाधव यांनी मृत्यू हा किती निस्ठुर होऊ शकतो याचा अंदाज आज मला आल्याची भावना या प्रसंगी व्यक्त केली. विशेष म्हणजे कोणत्याही अपघातानंतर नशेत गाडी चालवल्याने अपघात झाल्याची सर्वसामान्य प्रतिक्रिया येते. चंद्रशेखरला न ओळखणार्यांच्या मनात ही शँका येऊ शकते मात्र त्याच्या परिचिताच्या मनात ती डोकावली नाही.कारण त्याला कोणतंच व्यसन नव्हतं. सुपारीच्या खांडाचही व्यसन नसणारा हा शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व होता. यवतमाळ येथे त्याने घर घेतले होते. समंधित ठेकेदारा सोबत कामं वेळेत पूर्ण न केल्याने तॊ गेल्या काही दिवसापासून त्रस्त होता अशी माहिती समोर येत आहे. घराच्या कामासाठीच तॊ यवतमाळ ला गेला होता, सायंकाळचा अंधार, पुढून येणाऱ्या गाडीचा प्रकाशझोत, रस्त्यावर उभा असणारा नादुरुस्त ट्रॅक्टर,सिमेंट रोड व त्यात बसलेली जबरदस्त धडक या मृत्यूच्या सापळ्यात तॊ अडकला.
चंद्रशेखर वानखेडे याच्या सावनेर गावातील अंत्यविधीला हजारो नागरिक उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील गनमान्य नागरिकांनी साश्रू नयनांनी त्याला अखेरचा निरोप दिला. आजी माजी दोन्ही गटशिक्षणाधिकारी, अधिकारी कर्मचारी,सेकडो शिक्षक, या वेळी उपस्थित होते. पत्नी,वृद्ध वडील, बहिणी,चिमुकली निष्पाप मुलगी जिला बाप गेला हे सांगायचे कसे हे दुःख ही भावना अनेकांच्या काळजात तशीच ठेऊन त्याने जगाचा निरोप घेतला. अखेरचा हा तुला दंडवत म्हणण्याखेरीज आपल्याकडे अशा वेळी अन्य पर्याय देखील कुठला असतो.



राळेगाव यवतमाळ सिमेंट रस्ता अपघाताचा मृत्यूमार्ग ठरतो आहे. केवळ राळेगाव शहरात तब्बल सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. यवतमाळ पर्यंतच्या घटना यात धरल्या तर तॊ आकडा डझनाच्या वर जाईल.महामार्ग देखभाल दुरुस्ती यंत्रणा ठप्प पडली आहे. रस्त्यावरील काटेरी झुडपे हटवण्यात यावे या साठी जिल्हाधिकारी यांचे पर्यंत नागरिक निवेदन घेऊन गेले. महामार्गांवरील गावानजीक रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यातच दुचाकी चालक हेल्मेट चा वापर करीत नाही. शोकसभेत संजय देशमुख यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या सोबतच प्रत्येकाने दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर करा अशी सूचना वजा विनंती केली ती देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे.