बेकायदा वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी केला जप्त

राळेगाव तालुक्यात अवैध वाळूची तस्करी जोरात सुरू असतांना दिं २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वडकी पोलीसांनी बेकायदा वाळूची वाहतूक करतांना एक ट्रॅक्टर जप्त केला. हि कारवाई पोलिसांनी खैरी शिवारात केली असून महसूल प्रशासन अजूनही बघ्याच्या भुमिकेत असल्याचे दिसून येते.
तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला गेल्या महिनाभरापासून वाळू तस्करांनी अक्षरशः पोखरून टाकले आहे. महसुल प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य या व्यवसायाला चालना देत असल्याची ओरड कायम असून नागरिकांच्या तक्रारी व समाज माध्यमातून सातत्याने कारवाईची मागणी केली जात असतांना कारवाईसाठी अखेर पोलीसप्रशासनालाच कंबर कसावी लागली. वडकी पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोठ्या शिताफीने लगतच्या मारेगांव तालुक्यातील कोसारा घाटातून बेकायदा वाळूची वाहतूक करणारा बिना नंबरचा ट्रॅक्टर खैरी शिवारातून जप्त केला या प्रकरणी खैरी येथील चालक व मालक अशा दोन जणांविरोधात कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. हि कारवाई वडकी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनात जमादार आत्राम व चिकराम यांनी केली.