
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघांत प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधकांचा प्रचंड वाढता विरोध, अफवा व बिनबुडाच्या आरोपाचे अडथळे सोबतच राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत बलाढ्य असे प्रतिस्पर्धी उमेदवार ; आता काय होणार असे एका क्षणी वाटत असताना प्रत्येकवेळी ही राजकीय कोंडी फोडण्यात खासदार भावना गवळी यशस्वी होऊन राजकीय विश्लेषकाचे अंदाज चुकवतात खरंतर चार मंत्री अन् एका खासदारांचा पराभव करणं निश्चितच सोपं नाही मात्र दांडगा जनसंपर्क मतदारसंघातील विकास कामे तसेच जनतेच्या प्रचंड पाठिंबावर भावना गवळीनी अनेकदा विरोधकांचे दात घशात घालत बाजी मारली त्यामुळे खासदार भावना गवळीना शह देण्यासाठी आतापासूनच विरोधक रणनिती आखत असल्याने विविध राजकीय चर्चानी जोर धरला आहे. ________________
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघांत सर्वंच राजकीय पक्षांनी आपापल्या हालचाली गतिमान केल्या आहेत त्यानुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( उबाठा) गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून दिवसागणिक एक एक नाव समोर येत आहे शिवाय शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा दावा सांगायला सुरुवात केली आहे मात्र सद्यास्थितीत यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या (शिंदे गट) भावना गवळी करित असल्यामुळे या मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांचा दावा नैसर्गिक मानला जातो एकुणच उमेदवारीसाठी सर्वच राजकीय पक्षांत दिसत असलेली ही वाढती चढाओढ या निवडणुकीत चांगलीच रंगत आणणारं आहे .खरतर खासदार भावना गवळी यांचा राजकीय पाया हा मजबूत मानला जातो अकोला – वाशिम हा एकसंघ जिल्हा असताना स्व पुंडलिकराव गवळी यांच्या नेतृत्वात दोन्हीही जिल्ह्यात शिवसेनेच्या असंख्य शाखा स्थापन करून त्यांनी ग्रामीण भागात शिवसेनेची विण अधिकच घट्ट करून ठेवली.या संघटन बांधणीचा राजकीय फायदा हा स्व. पुंडलिकराव गवळी यांना एकदा खासदारकीच्या स्वरुपात मिळाला.तर त्यानंतर पाच वेळा भावना गवळीना मिळाला. स्व पुंडलिकराव गवळी यांच्या कार्याचा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एवढा प्रभाव पडला होता की त्यांनी वाशिमला स्वतंत्र जिल्ह्यांचा दर्जा देऊन स्व. पुंडलिकराव गवळी यांचा हट्ट पुर्ण केला. आणि तेव्हापासुन वाशिम जिल्ह्यांचे शिल्पकार म्हणून स्व. पुंडलिकराव गवळी जिल्हा वासियांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यानंतर प्रथमच १९९९ मध्ये भावना गवळी यांनी माजी मंत्री तथा माजी खा. अनंतराव देशमुख यांचा पराभव करून तेराव्या लोकसभेमध्ये अत्यंत कमी वयाच्या युवा खासदार म्हणून पदार्पण केले प्रथमच खासदार झाल्यानंतर भावना गवळी यांनी मतदार संघातील कामाला अधिकच गती दिल्यामुळे पहिल्या एका वर्षातच त्या महिला युवती व युवा वर्गाच्या पसंतीत उतरल्या
तेव्हा पासून त्यांनी कधी ही मागे वळुन पाहिले नाही सन २००४ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री मनोहरराव नाईक यांचा पराभव केला.सन २००९ मध्ये मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा पराभव करून हॅट्रिक साधली तर २०१४ मध्ये आदिवासी समाजाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला.तसेच सन २०१९ मध्ये माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे पाचही वेळा राजकीय व सामाजिक दृष्ट्या तगडा उमेदवार देऊनही खासदार भावना गवळीना शह देवू न शकल्यामुळे यावेळी विरोधकांनी सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यासोबतच राजकीय व्युहरचना आखण्याचे काम हाती घेतल्याचे एकंदरीत हालचालीवरून दिसून येत आहे.