
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्व. चिंधूजी लक्ष्मण पुरके शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन दिं ०२ फेब्रुवारी २०२४ ते ०९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दत्तकग्राम झाडगाव येथे आयोजित करण्यात आले असून या विशेष शिबिराचा दिं ०९ फेब्रुवारी रोजी समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या आठ दिवसीय विशेष शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता विशेष उपक्रम राबविले. यामध्ये श्रम संस्कार, बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास या गुणावर विशेष भर देण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय संविधान जनजागृती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य, महत्व व स्वयंसेवकांचे कर्तव्य, दंतरोग व व्यसनमुक्ती मार्गदर्शन, जीवन सुंदर आहे, व्यक्तिमत्व विकास , महिला सक्षमीकरण , एड्स समुपदेशन, उपचार, पशु आरोग्य, शेतकरी आत्महत्येविरुद्ध प्रबोधनात्मक उपक्रम, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविले. गावातील नागरिकांसाठी मोफत दंतरोग तपासणी शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत पशु आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रमदांनामध्ये ग्राम स्वच्छता, मोक्षधाम स्मशान भूमीची स्वच्छता, तुकोडोजी मंदिर परिसरात ४ × ५ चा ६ फूट खोल शोषखड्डा करून परिसरातील संपूर्ण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात आली, गावातील नाल्या स्वच्छ केल्या. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व शिबिरादरम्यान विकासाकरिता आयोजित बौद्धिक सत्रामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर, प्रमुख पाहुणे म्हणून मा. चित्तरंजनदादा कोल्हे (जि. प. सदस्य, झाडगाव), मा. अशोक केवटे (माजी सभापती), मा. बाबाराव किन्नाके (सरपंच, झाडगाव), मा. रमेश विलायतकर (गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष, झाडगाव), मा. वासुदेव तिजारे (तंटामुक्ती अध्यक्ष), हरिदास कुबडे (मध्यवर्ती प्रतिनिधी, गुरुकुंज आश्रम, झाडगाव), मारोती पाल (संचालक, खरेदी विक्री संघ), उमेश केवटे (ग्राहक मंच अध्यक्ष, झाडगाव), मा.रुपेश रेंघे (ग्रामग्रीताचार्य तथा महा. शासन वर्धा जि. वर्धा पुरस्कृत) आदी मान्यवरांचा सहभाग असून शिबिराच्या माध्यमातून जे उपक्रम गावामध्ये राबविले त्याबद्दल सर्व स्वयंसेवकांचे मान्यवरांनी कौतुक केले.
रासेयो विशेष शिबिरांतर्गत गावातील महिला व मुलांकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यानिमित्त स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोपीय प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्नील गोरे यांनी श्रमसंस्कार शिबिरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये उपयुक्त होणारा श्रमसंस्कार मूल्यांची रुजवणूक या शिबिरामध्ये झाली अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष आगरकर, यांनी शिबिरांतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमाचा फायदा विद्याथ्यांच्या भावी जीवनाकरिता होईल असे प्रतिपादन केले व स्वयंसेवकांचे कौतुक केले. आभार महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. भाग्यश्री लोहकर यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाकरिता सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल लिहितकर व प्रा. पी. एस. आगलदरे व रासेयो स्वयंसेवकांची उपस्थिती होती.
