रामभाऊ भोयर
यवतमाळ – वाशीम लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री पाटील यांचे समर्थनार्थ श्री ओमप्रकाश तापडियांनी शेतकरी संघटने च्या बिल्लांचा वापर करीत पाठिंबाचे पत्रक काढले आहे. ते शेतकरी संघटनेच्या निर्णयाच्या विरोधात आहे. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा ची त्यांची भूमिका वैयक्तिक आहे, संघटनेची नाही. शेतकरी संघटनेचा या लोकसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी, वंचीत बहूजन आघाडी या प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांना पाठिंबा नाही.
शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पक्षाने या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे श्री नरेंद्र मोदी सरकारने मागील निवडणुकीत संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी चे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही उलट उद्योगपतींचे लाखो कोटीचे कर्ज राईट अप केले.शेतमाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही, तर प्रचंड प्रमाणात सुताच्या, कापसाच्या गाठी आयात शुल्क कमी करून आयात केली आणी कापसाचे भाव पाडले. सोयापेंड ( सोयाढेप), पामतेलाची आयात शुल्क कमी करून देशातील सोयाबीन चे भाव पाडले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, विज दरांची दरवाढ कमी करण्या ऐवजी प्रचंड कर आकारून भाववाढ केली. युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याऐवजी नोकरी कपात करून व सरकारी नोकरी भरती बंद करून लाखो युवक बेरोजगार केले. दिलेले एकही आश्वासन १० वर्षात पूर्ण केले नाही. कृषी सुधारणांच्या नावाखाली युगातमा शरद जोशीं यांचें नाव घेवून संसदेत सादर केलेले तिन कृषी कायदे विना चर्चेने लागू केले, ज्यांचे समर्थन शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाने केले होते. पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले, कोर्टाने कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देवून ३ सदस्यीय कमेटी नेमली, त्या कमेटीने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला. त्याच काळात मोदी सरकारने सोयापेंड, सुताची आयात करून, कांदयावर निर्यात बंदी लावून शेतमालाचे भाव पाडले.
महत्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्या अगोदरच मोदी सरकारने विना चर्चेने तिन कृषी कायदे परत घेवून कृषी सुधारणांच्या नांवावर आणलेले ३ कृषी कायदे ही नौटंकी होती, हे सिद्ध करून सुधारणा वादी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. ईडी, सीबीआय आयकर विभाग या स्वायत्त संस्था चा वापर करीत देशातील विरोध पक्षांतील लोकांवर भष्टाचाराचे आरोप करीत चौकशा सुरू केल्या. त्यांचेवर दबाव टाकत पक्ष फोडून सत्तेत सहभागी केले, काहींना पक्षात घेवून मंत्रीपद, राज्यसभा सदस्य पदे दिली, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. सुदृढ लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. तसेच अल्प बहूमताचे सरकार हे जनतेच्या मागण्यांप्रती संवेदनशील असते, म्हणून कोणत्याही आघाडीला पाशवी बहूमत मिळणार नाही, याची दक्षता म्हणून या निवडणुकीत भाजप, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करू नये, तिनही आघाड्यांचे उमेदवार सोडून विदर्भवादी उमेदवाराला मतदान करावे, हि भूमिका जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी, मतदारांनी स्वतंत्र भारत पक्षाची भूमिका लक्षात घेऊनच मतदान करावे. शेतकरी संघटनेच्या बिल्लांचा, झेंड्याचा वापर निवडणूकी च्या खुल्या प्रचारात करू नये, असे आवाहन शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र झोटींग, स्व.भा.पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री देवरावजी धांडे, शेतकरी संघटना वाशिम जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र ठाकरे स्व.भा.पक्षाचे वाशीम जिल्हा अध्यक्ष श्री. सोपानराव मनोहर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
