राजस्थानी मल्टीस्टेट ढाणकी शाखेकडून ठेवीदारांची फसवणूक:: आणखीन अधिक व्याज देणाऱ्या गंगा नदया व एक आरडी एजंट पोबारा करणार ही धास्ती ग्राहकात कायम??


प्रतिनिधी:: ढाणकी
प्रवीण जोशी


राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ यांच्या चेअरमन सह संचालक मंडळ (ढाणकी) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ढाणकी येथील गुंतवणूकदारांनी सामूहिकरीत्या निवेदनाद्वारे तक्रार दिली.
येथील जुने बसस्थानक परिसरात मध्ये 3 ऑगस्ट 2023 ला मोठा गाजावाजा ,लवाजमा करून थाटामाटात शाखेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ढाणकी व परिसरात घरोघरी व बाजारपेठेत जाऊन इतर बॅक व पतसंस्थेपेक्षा अधिक परतावा व आधुनिक सुविधा देऊ अशी खोटी प्रलोभने दाखवून पतसंस्थेत गोरगरीब वर्ग व धनदांडग्यांची रक्कम गुंतवण्यासाठी प्रयत्न केले. या आमिषाला बळी पडून बऱ्याच ठेवीदारांनी आपली रक्कम पतसंस्थेत गुंतवली. आपल्या अडचणीच्या वेळी, सुख- दु:खात ही रक्कम कामी येईल या आशेने शेकडो ठेवीदारांनी रक्कम गुंतविली. ढाणकी शाखेत जवळपास 6 कोटींची गुंतवणूक झाली असल्याचे ठेवीदारांकडून सांगितले जात आहे.परंतु नोव्हेंबर महिन्यापासून शाखेचा व्यवहार पूर्णपणे डबघाईस आल्यामुळे ठेवीदारांना आपली रक्कम मिळविण्यासाठी “तारीख पे तारीख” मिळत गेली तसेच उडवा – उडवीचे उत्तर मिळत होते.पण गुंतवणूक केलेली रक्कम काही मिळत नव्हती. त्यामुळे शेवटी ठेविदारांनी 17 फेब्रुवारी 2024 ला सहकार मंत्री, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक, तालुका निबंधक, तहसीलदार तसेच शाखा व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपली रक्कम मिळवण्यासाठी निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाची कोणतीही दखल आजपर्यंत न घेता ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही.

आपली रक्कम मिळणार की नाही? या विवंचनेत ठेवीदार असून शेवटी ढाणकी पोलीस चौकी येथे काल दिनांक 26 जून 2024 रोजी चेअरमनसह संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे नोंदविण्यासाठी सामूहिकरीत्या 43 जणांच्या ठेवीदारांच्या स्वाक्षरीने सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांना निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली असून चौकशी करून तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावी अशी यावेळी मागणी केली अशा फसवणूक होणाऱ्या घटनेमुळे ग्राहक मात्र चांगलाच भेदरलेले अवस्थेत आहे.