
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महायुती सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित. अशोकराव मेश्राम यांनी काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेली आहे.मी काँग्रेस कमेटीचा जिल्हाध्यक्ष आहे, काँग्रेस विचारधारेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत,कोण काय म्हणतो याची पर्वा नाही. या वेळी जनता म्हणेल त्याला काँग्रेस ची उमेदवारी मिळेल. राळेगाव न. प. मध्ये उमेदवारी देतांना आम्ही हाच प्रयोग केला. अशोक मेश्राम यांनी जनतेत जावे, जनतेचा विश्वास संपादन करावा, आज अंत्यत चांगला सन्मान सोहळा त्यांनी आयोजित केला मला याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड. प्रफुल मानकर यांनी केले. राळेगाव येथील वसंत जिनींग सभागृह येथे 15 ऑगस्ट रोजी माजी सैनिकांचा सन्मान , पंढरपूर वारी-दिंडीकरी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार तथा सुप्रसिद्ध संगम आर्केस्टा अमरावती यांचा देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते.या कार्यक्रमाला तालुका,राळेगाव शहर व परिसरातील गावातून आलेल्या नागरीक महिलां-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी सैनिक अनंत वाट, तर प्रमुख अतिथी म्हणून, शेतकरी नेते बाबासाहेब दरणे,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर जवादे, शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद काकडे,सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पंधरे, एम. डी.कोडापे, नगराळे साहेब,सैय्यद रहमानभाई आदी उपस्थित होते.
या वेळी तालुक्यातील माजी सैनिकांचा सामाजिक कार्यकर्त्यांना, वारकरी -दिंडीकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘ ये वतन तेरे लिये…’ या थीम खाली बहारदार देशभक्तीपर गीतांची मेजवानी विदर्भातील सुप्रसिद्ध संगम आर्केस्ट्रा चे गायक -गायिका द्वारे सादर करण्यात आली . सुमधुर देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्यदिनी देशभक्ती चा माहोल तयार केला.आयोजक अशोक मेश्राम यांनी मनोगतातुन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मी पोलीस खात्यात तीन दशक सेवा दिली. राळेगाव मतदार संघात माझी जन्मभूमी आहे. शेतकरी, कष्टकरी, व जनतेचे प्रश्न बिकट होत आहेत,मला जनसेवा करायची आहे. आपला आशीर्वाद दया अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या वेळी अशोक भाऊ तुम आगे बढो च्या घोषणानी सभागृह दनाणून गेले.
पुढे बोलताना ऍड. प्रफुल मानकर यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून सामाजिक ऋण व देशभक्तीची भावना दृढ करणाऱ्या या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे पहिल्यांदा आयोजन होत आहे. इथे उपस्थित सर्व मंडळी माझ्या परिचयाची आहे. सहकारी आहेत असे वक्तव्य केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमात अखेरपर्यंत गर्दी कायम होती. या कार्यक्रमाचे खुमासदार संचलन मनिष काळे यांनी तर आभार युसुफअली सैयद यांनी मानले.
