
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नापिकी, कर्जबाजारीपणा व शेतमालाला कमी बाजारभाव हे दृष्ठचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. कितीही लाडक्या योजनाचा मुलामा दिल्या गेला तरी अस्मानी व सुलतानी व्यवस्थेला शेतकरी काही लाडका नाही असा अनुभव आता नवा राहिला नाही. गेल्या दशकभरापासुन सातत्याने नापिकीचा सामना करावा लागणारा शेतकरी यंदा ही हवालदिल झाला आहे. नापिकीचे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने गावागाड्यात विलक्षण अस्वस्थता दिसते. यंदाच्या संततधार पावसाने कपाशीची वाढ खुंटली तर सोयाबीन पिकाला देखील पुढील काळात पाऊस झाल्यास धोका निर्माण होईल, तूर पिकाचे तर मोठ्या प्रमाणात आजच नुकसान झाले आहे. एकंदर नापिकीचे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.
राळेगाव, कळम, बाभुळगाव हा कापूस उत्पादक पट्टा. इथली संपूर्ण अर्थव्यवस्था कापसाच्या पीकी वा नापिकीवर अवलंबुन आहे. राळेगाव तालुक्यात 50 हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा कपाशीची लागवड झाली. त्या खालोखाल सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. सोयाबीन व कपाशी मध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यात आली. अतिवृष्टीने या तिन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात कपाशी तीन चार फूटावर असते. वीस -पंचवीस बोन्डे व पाच -पन्नास पात्या या वेळी अपेक्षित असतात आणि त्याने या वेळी कपाशी लगडलेली असते सुद्धा मात्र या वर्षी 15 ऑगस्ट उलटून गेला तरी कपाशीची वाढ कुठे एक फूट तर कुठे दोन फूट अशी खुंटली आहे. वाढचं न झाल्याने कपाशीच्या उत्पादनात यंदा मोठी घट येण्याची शक्यता दिसते. सोयाबीन पीक हिरवेगार दिसतं असले तरी पुढे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तो खरा ठरल्यास फुलावर, सेंगावर व सवंगनीवर असतांना मोठा पाऊस झाल्यास सोयाबीन पीकदेखील हातचे जाऊ शकते. अति पावसाने तुरीची झाडें कधीचीच जळून गेली आहे.
राळेगाव तालुका मागील तीन वर्षा पासुन कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाच्या गर्तेत सापडतो आहे. दोन वर्षा आधी हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड कहर माजवला होता. तब्बल 11 गावे पाण्याखाली गेली. सहा जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. दुबार -तिबार पेरणी नंतरही उत्पादनात घट आली मागील वर्षी काही प्रमाणात कपाशीचे पीक हाती आले मात्र बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांची देणी तशीच थकीत राहिली यंदा तर संततधार पावसाने उघडीपच दिली नाही. याची परिनीती शेतकरी आत्महत्या सारख्या घटनात वाढ होण्यामध्ये दिसून येत आहे. पोळ्याच्या आधीच नापिकीची चिन्हे उमटू लागल्याने चिंतेचे मळभ अधिक गडद झाल्याचे दिसते.
राळेगाव, कळम, बाभुळगाव या तालुक्यात एक ही मोठा उद्योग नाही. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. शेतीत रोजगार आहे पण शेतात काम करण्याची मानसिकता नाही. नेत्यांनी राजकारणाची किळसवानी पद्धत सुरु केली. गावात दगड उचलला की पुढारी दिसावा अशी स्थिती आहे. बार -ढाबे संस्कृती फोफावणे ही नेत्यांची देण आहे. यंदा नापिकी होणार असा माझा अनुभव सांगतो. पन्नास वर्षा पासुन मी शेती करतो आहे. यंदा चे संकट वेगळ्या अर्थाने चिंतेचे आहे. कपाशीची वाढ झालेली नाही आणि उत्पादन खर्च मात्र वाढलेला आहे. कपाशी वाचवावी तर खर्च वाढतो आणि उत्पनाची हमी नाही, त्यातच कर्ज देणाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. बँकाना तर शेतकरी ग्राहकच नको, आम्ही एक लाख सवीस हजार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडत आहोत. अजून काय करावे शेतकऱ्यांचे संघटन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे आलं पाहिजे. राजकारणी नेते कधीच भलं करु शकत नाही.
बाबासाहेब दरणे
हिवरा( द )
(प्रगतीशील शेतकरी )
