शिक्षक दिनाचे औचित्य साधून एल.एम.बी.शाळेत श्रावनसिंग वडते सरांचा सत्कार


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक श्रावनसिंग वडते हे 31/5/2024 रोजी वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले असतांना त्याच गावात असलेल्या लक्ष्मीबाई महादेवराव भोयर शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5/9/2024 रोजी म्हणजेच शिक्षकदिनी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती लता भोयर मॅडम व सहकाऱ्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक निलेश मेंढे सरांनी करून वडते सरांच्या शालेय कार्याबाबत माहिती दिली.सोबतच सहायक शिक्षक शिवा जाधव सर यांनी सुद्धा माहिती दिली.त्यानंतर सत्कारमुर्ती श्रावनसिंग वडते सर यांनी सत्काराला उत्तर देताना मी जरी वरूड जहांगीर येथील रहिवासी असलो तरी माझे शिक्षण झाडगावातच झाले असून माझी कर्मभूमी सुद्धा झाडगाव राहिली आहे आपण माझा सत्कार घेऊन माझी जबाबदारी वाढवली असून आपणास भविष्यात विद्यार्थ्यांबाबत मदत लागली तर मी आपणास सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देऊन सर्व शिक्षक बंधू भगिनींचे धन्यवाद मानले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती लता भोयर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातून वडते सरांच्या शालेय कार्याची स्तुती केली. यावेळी मंचावर मुख्याध्यापिका लता भोयर मॅडम,जेष्ठ शिक्षक राजू भोयर सर, निलेश मेंढे सर,शिवा जाधव सर, गेडाम सर,प्रशिक भोयर सर, चौधरी मॅडम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक राजू भोयर सर यांनी केले तर आभार शिवा जाधव सर यांनी मानले.या कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.