सण आला दारात शिधा नाही घरात
गौरी गणपती उत्सव संपला तरी गोरगरिबांना आनंदाचा शिधा मिळेना

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गौरी गणपती उत्सव गोड व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा देण्याची निर्णय घेण्यात आला होता. परंतु, गौरी गणपती उत्सव संपला तरी अजूनपर्यंत आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने आणखी आनंदाचा शिधा मिळायला किती दिवस लागणार आहे. व लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कधी हाती येणार, याबाबत सांगणे जरा कठीणच आहे. त्यामुळे सण आला दारात, मात्र शिधा नाही घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप-शिंदे गट शिवसेनेचे राज्यात सरकार आल्यानंतर या सरकारने गोरगरिबांच्या घरातही सण-उत्सवात गोडधोड तयार करता यावे यासाठी आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून राज्य शासनाकडून सण-उत्सवात आनंदाचा शिधा रेशन लाभार्थ्यांना पुरविला जात आहे.
सरकारने यंदाच्या गौरी-गणपती सणाला
सप्टेंबर दरम्यान शिधा वितरणाचा निर्णय घेतला होता परंतु गौरी गणपती उत्सव संपला तरी रास्त दुकानात अद्यापही शिधा संच वेळेपर्यंत पोहोचला नसल्याने गरिबांच्या घरात गोडधोड करता आले नाही.
तसेच सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्याने लाडक्या बहिणींना ओवाळणी देण्याच्या आनंदात सरकारला आनंदाचा शिधा देण्यात विसर तर पडला नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील वर्षी रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंचा संच १०० रुपयांत देण्यात आला होता. यानंतर रामजन्मभूमी सोहळा व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या शिध्यामध्ये मैदा व पोह्यांचा समावेश करण्यात आला होता.
यावर्षी ला गौरी गणपती उत्सवात पुन्हा सहावरून चार शिधा वस्तूंचा संच मिळणार आहे. मात्र गौरी गणपती उत्सवाला चार जिन्स पैकी तेल ,साखर, डाळ उपलब्ध झाली होती परंतु रवा उपलब्ध झाला नसल्याने वाटप करण्यात आला नाही मात्र एक दोन दिवसात रवा उपलब्ध होणार असून लगेच रास्त धान्य दुकानात वाटप करण्यात येईल असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.